असाही एक आहेर …
To read this article in English- Click Here
काही महिन्यांपूर्वी निखिलशी बोलणं चालू होतं. मी सध्या गूंज फेलोशिप करत असल्याने तो गूंजच्या कामाबद्दल विचारत होता. त्याला मी गूंजच्या Cloth For Work (CFW) Not Just Piece of Cloth (NJPC), Rahat, School 2 School (S2S) ह्या उपक्रमांबद्दल माहिती दिली. तसेच शहरी भागात गूंज काय काम करतं हे सुद्धा सांगितलं. त्याला गूंजचा ‘Cloth For Work‘ हा उपक्रम सर्वात जास्तं आवडला.
ह्या उपक्रमाअंतर्गत गूंज शहरी भागातील अतिरिक्त (surplus) अथवा वापरात नसलेलं साहित्य जसं की कपडे, भांडी, खेळणी, पुस्तके, शालेय साहित्य ह्याचा उपयोग ग्रामीण भागात लोकांना त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी करते. ह्या सर्व साहित्यापासून ‘फॅमिली किट’ बनवलं जातं. CFW अंतर्गत गावातील लोकं एकत्र येऊन त्यांना स्थानिक पातळीवर ज्या समस्यांना तोंड द्यावं लागतं त्या समस्या सोडवतात. उदाहरणार्थ, एखाद्या गावात पाण्याची अडचण असेल तर लोक एकत्र येऊन विहीर खोदतात, तलाव बांधतात अथवा विहीर दुरुस्तं करतात. आत्तापर्यंत ह्या उपक्रमाअंतर्गत लोकांनी विहिरी, पूल, रस्ते व तलाव इत्यादी बांधले आहेत अथवा दुरुस्तं केले आहेत. अन सहभागी लोकांना त्यांनी केलेल्या कामाच्या बदल्यात ‘फॅमिली किट’ दिलं जातं.
हे ऐकून त्याच्या डोक्यात लगेच कल्पना आली की लग्नात आहेराच्या ऐवजी आपण लोकांना त्यांच्याकडचे जुने/नवीन वापरण्यायोग्य कपडे आहेर म्हणून द्यायला का सांगू नये. आमचं हे बोलणं साधारण ऑगस्टमध्ये चालू होतं अन त्याच्या लग्नाची तारीख होती ३० जानेवारी २०२०. आपल्या सर्वांकडे अनेक कपडे असतात. त्यातले बरेच चांगल्या स्थितीत असूनसुद्धा आपण ते नं वापरल्यामुळे तसेच पडून असतात. जर त्याचा वापर एखाद्या गरजू व्यक्तीसाठी तसेच एखादी समस्या सोडवण्यासाठी होणार असेल तर त्यासाठी काय करता येईल हा विचार निखिलने केला. त्याची कल्पना नक्कीच हटके होती फक्तं लोकांचा प्रतिसाद कसा मिळेल ह्याबाबत शंका होती. त्याहून महत्वाचं घरच्यांचा ह्या उपक्रमासाठी आशीर्वाद मिळणं गरजेचं होतं.
निखिलनी त्याच्या लग्नात पाहुण्यांकडून आहेर म्हणून जुने अथवा नवीन वापरण्यायोग्य कपडे स्वीकारण्याचा प्रस्ताव मांडला. जेवढे कपडे जमा होतील तो ते गूंजकडे देणार होता. त्याच्या ह्या प्रस्तावाला दोन्ही कुटुंबियांकडून हिरवा कंदील मिळाला. ह्याकरिता लग्नाच्या पत्रिकेवर जो मजकूर छापायचा होता त्याचं काम सुरभि केसकरने सोप्पं केलं. त्या मजकुराचा फोटो खाली दिला आहे.
हा एक नवीन प्रयोग होता. ह्यात कितपत यश मिळेल अथवा प्रयोग फसेल ह्याचा काहीच अंदाज नव्हता .असा कुठलाही उपक्रम करण्याचा अनुभव आमच्यापैकी कुणाकडेच नव्हता. निखिलने त्याच्याकडून ह्या उपक्रमाची माहिती सर्वांपर्यंत पोचवली होती. आता वाट पाहण्यापलीकडे दुसरा काही पर्याय नव्हता. तर एकीकडून येणारा सकारात्मक प्रतिसाद दिलासा देणारा व आत्मविश्वास वाढविणारा होता.
अखेरीस वकीलसाहेबांच्या लग्नाचा दिवस उजाडला. येणाऱ्या पाहुण्यांकडून कपडे स्वीकारण्याची जबाबदारी अक्षयने स्वतःकडे घेतली होती. त्यासाठी आवश्यक ती तयारी करून तो सज्ज झाला तर एकीकडे निखिल त्याच्या आयुष्यातल्या पुढच्या लढाईसाठी सज्ज होत होता. जसजसा मुहूर्त जवळ येत होता तशी पाहुण्यांची गर्दी व्हायला लागली. अनेकांनी नं विसरता त्यांच्याकडचे जुने व नवीन वापरण्यायोग्य स्थितीतले कपडे सोबत आणले होते. विशेष म्हणजे कपडे व्यवस्थित घडी व इस्त्री केलेले होते . बघता बघता बरेच कपडे जमा झाले. अनेकांना कार्यालयात पोचल्यावर त्यांनी घरी आहेर म्हणून देण्यासाठी कपडे बाजूला काढून ठेवले होते हे आठवलं . अनेकांनी गूंज बद्दल माहिती विचारली. त्यांना अक्षय माहिती देत होता.
मिळालेला प्रतिसाद पाहता आम्हाला हायसं वाटलं . हा प्रयोग एकप्रकारे समाधान देणारा ठरला. ह्यातले २ महत्वाचे घटक म्हणजे पुढाकार व सहभाग. निखिलने असा हटके उपक्रम राबवण्याचा घेतलेला पुढाकार व लोकांनी त्यास दिलेला प्रतिसाद व नोंदवलेला त्यांचा सहभाग. ह्या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत. पुढाकाराविना सहभाग तर सहभागाविना पुढाकार अपूर्ण असतो ह्याची जाणीव ह्या प्रयोगाने पुन्हा एकदा करून दिली.
हा प्रयोग सर्वांमुळे कुठेतरी यशस्वी होऊ शकला. काही नमूद केल्याशिवाय पुढे जाणं योग्य ठरणार नाही. सर्वप्रथम Adv. निखिल सावकार आणि मुक्ता वं दोघांचे कुटुंबीय, सहभागी सर्व पाहुणे मंडळी आणि अक्षय व यश ज्या दोघांनी ह्या उपक्रमाची व्यवस्था उत्तमपणे पार पाडली . तसेच अक्षय व काजलने जमा झालेले कपडे गूंजच्या पुण्यातल्या अधिकृत केंद्रावर नेऊन पोचवले.
आत्ता हे वाचत असताना तुमचयापैकी अनेकांच्या डोक्यात ह्यापूर्वी कधीतरी अशा हटके कल्पना येऊन गेल्या असतील अथवा पुढे येतील सुद्धा. पण आपल्यापैकी बरेचजण घरचे, समाज काय म्हणेल म्हणून त्या विचारांना कल्पांपुरतंच मर्यादित ठेवतो. पण जर थोडं धाडस केलं अन कल्पनांना कृतीची थोडी जोड दिली तर काय होऊ शकत हे निखिलने त्याच्या कृतीतून दाखवून दिलं आहे.
काय मग देताय ना तुमच्या हटके कल्पनांना कृतीची जोड ?
तुम्हाला निखिलचा हा हटके उपक्रम आवडला असेल तर नक्की शेयर करा तसेच तुमचे मत कमेंटमध्ये मांडायला विसरू नका.
तुम्हाला जर निखिल आणि मुक्ताकडून ह्या उपक्रमाविषयी अधिक जाणून घ्यायचे असेल आणि शुभेच्छा द्यायच्या असतील तर त्यांच्याशी संपर्क साधू शकता. Adv. Nikhil Sawkar- 97622 23649