आनंदी गोपाळच्या निमित्ताने…
सुरुवात कबुलीने करायला हवी की, या विषयावर आज लिहायचं, असं काही ठरलं नव्हतं. इतर बऱ्याचजणांसारखा मी सुद्धा झोपेत होतो. आनंदीबाई आणि गोपाळरावांचे काम पाहून वाटले की ह्या दोघांनीच आपल्या सगळ्यांच्या वाटचे फटके स्वतःच्या अंगावर घेतले आहेत. त्याचे वळ देखील त्यांच्याच कुटुंबावर उमटले. प्रत्येक दिवशी होणाऱ्या त्रासाचे, टीकेचे , लढ्याचे रुपांतर आपण २ तासाच्या चित्रपटात पाहतो. पण रोज उठून तो लढा देणं, ते सुद्धा यशाची खात्री नसताना हे आपण अनुभवत नाही. आपण सगळेच वेगवेगळ्या प्रमाणात संवेदनशील असतो. पण त्या संवेदनशिलतेचे कोणत्या कृतीत रुपांतर होईल हे प्रत्येकाचे निराळे. तसाच, आनंदी बाईंचे आयुष्य पाहिल्यावर सुद्धा प्रत्येकावर वेगळा परिणाम होतो. पाहिल्या पाहिल्या सोडून देणार्यांपासून, त्यातून प्रेरणा घेऊन आपला रस्ता शोधणारे सगळे आले.
१८८५ मध्ये, वयाच्या २१ व्या वर्षी, एका स्त्रीने इंग्रजी मधून वैद्यकीय पदवी घेणे, ते ही एकटीने परदेशात जाऊन ! मनात खूप वाटतंय की ह्याची तुलना सध्या च्या कोणत्या तरी कामगिरीशी करावी पण तो प्रयोग उगाच फसेल म्हणून टाळतो. शिवाय, तुलना केल्याने त्यांनी मिळवलेल्या यशाचे वजन कमी जास्त होणार नाही.
प्रत्येकाची काही तत्वं असतात. सगळ्यांना वाटत असतं आपल्याला आपल्या मनासारखं वागता यावं. पण हळू हळू कळत जातं की नाती दुखावल्याशिवाय ते शक्य होत नाही. एकीकडे तत्वं दिसत असतात आणि दुसरीकडे नाती. एकीकडे भविष्याचे हित दिसत असते आणि दुसरीकडे सद्यस्थिती. पण ह्यातून सुद्धा ज्यांची नाव पलीकडच्या तीरावर पोचते ते येणाऱ्या अनेक पिढ्यांचं भलं करतात. पण पुढच्या पिढ्यांना त्याची तीव्रता माहित असते का? आपण तशी अपेक्षा करावी का? जसे आपण प्रेम, राग, व्यक्त करतो तशी ह्या तीव्रतेची जाणीव आपण व्यक्त करतो का? त्या दोघांनीही समाजाची पर्वा न करता ध्येय गाठलं. त्यांचावर अगदी बहिष्काराची वेळ आली. तेव्हाच्या समाजाच्या दृष्टीकोनातून बघायला गेलं तर आनंदीबाई आणि गोपाळरावांचं वागणं बंडखोर होतं, समाजाच्या दृष्टिने चूक होतं. पण आजचा समाज त्याला चूक म्हणतो का? मग तसंच, आताच्या समाजाच्या दृष्टीकोनातून काही बदलांना विरोध होतो, त्याला उद्या येणारा समाज विरोध करेल का?
आनंदी बाईंच्या आयुष्यातून फक्त स्त्री शिक्षण एवढेच सार आहे असे मला वाटत नाही. त्या समाजाच्या जश्या समस्या होत्या, तशाच आजच्या समाजाच्या सुद्धा आहेत. काळ वेगळा असल्यामुळे कदाचित त्रास एवढा नसेल. तेव्हाच्या समाजाला अशिक्षितपणाच्या झोपेतून जागं करण्याची गरज होती आणि आताच्या समाजाला, ‘स्व-कुटुंब-समृद्धी’ च्या झोपेतून जागं होण्याची गरज आहे. तेव्हाच्या समाजाला, त्यांना हक्क आहेत, त्यांच्यासोबत काही तरी चुकीचं घडतंय ही जाणीव करण्याची गरज होती. आताच्या समाजाला मिळालेले आयते हक्क कोणाच्या व किती कष्टाने मिळालेत त्याचं महत्व समजून घेण्याची गरज आहे.
उदाहरण घ्यायचं तर अजूनही बऱ्याच भारतीय स्त्रिया अनेक परंपरा पाळतात ज्या सध्याच्या काळाशी सुसंगत नाहीत. अर्थात त्यांना त्या अर्थपूर्ण वाटत असतील. ह्यामध्ये एखादी आनंदीबाई, सावित्रीबाई होते आणि पुढच्या पिढ्यांना चांगले आयुष्य देते. मुळात कोणत्याही परंपरेला विरोध होण्यासाठी दोन गोष्टी गरजेच्या आहेत. पहिले लोकांना ‘जाणीव’ झाली पाहिजे की ती चुकीची आहे आणि त्यात बदल गरजेचा आहे. कारण जोपर्यंत जे चालू आहे ते बरोबरच असणार ह्या गोष्टीवर विश्वास असतो तोपर्यंत ‘जाणीवेचा’ संबंधच येत नाही. हजारो वर्ष ‘जात’ ह्यावरच टिकून आहे. आणि दुसरं म्हणजे स्वतःपासून सुरुवात करायची तयारी. सध्याच्या समाजानेच एकदा स्वतःला आरश्यात बघायला काय हरकत आहे? एकदा स्वतःला विचरून बघितले की आपण जे पाळत आहोत, मानत आहोत, ते स्वतःला पटते म्हणून? का मनात ते तोडायचे बळ नाही म्हणून? उत्तर आपले आपल्याच मिळेल. सध्याचे जग व्यक्तिस्वातंत्र्यावर चालते. जर तुमच्या मनात एखादी अनिष्ट परंपरा तोडायचे बळ नाही तर ज्याच्यात आहे त्याला तोडू द्यावे!
‘आनंदीबाई’ ही जशी व्यक्ती होती तशीच ती एक वृत्ती सुद्धा आहे. अनेक स्त्रिया आता वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांचं योगदान देत आहेत. त्यांना बऱ्याच कसोटींचा सामना करून तिथवर पोचता आले असावे. ज्या काळात संपूर्ण जग उद्योगीकरणाच्या मागे धावत होतं तेव्हा रेचल कार्सन नावाच्या महिलेने ‘Silent Spring’ नावाचे पुस्तक लिहिले. त्यात तिने निसर्गावर होणाऱ्या दुष्परिणामांना वाचा फोडली. तेव्हा ‘हवामान बदल ही निव्वळ अफवा आहे’ असे म्हणून लोकांनी व राजकीय नेत्यांनी त्यांना वेड्यात काढले. त्यांच्या या पुस्तकामुळे पर्यावरण विषयाला जागतिक महत्व प्राप्त झाले. Centre For Science and Environment संस्थेच्या सुनिता नारायण, गेली अनेक वर्ष, पर्यावरण-अर्थकारण-राजकारण ह्या तिन्ही च्या परस्पर संबंधांविषयी काम करत आहेत. सामाजिक कार्यकर्त्या नंदा आमटे, सिंधुताई सपकाळ, स्त्री हक्कांसाठी काम करणाऱ्या विद्या बाळ, महारोगी सेवा समिती च्या CEO शीतल आमटे-करजगी, व्यसनमुक्ती क्षेत्रात काम करणाऱ्या मुक्ता पुणतांबेकर, स्त्रियांच्या मंदिर प्रवेशासाठी लढा देणाऱ्या कार्यकर्त्या, आणि अशा अनेक लढवय्या स्त्रिया, आनंदीबाईंचा वारसा अनेक क्षेत्रात चालवत आहेत.
आनंदीबाईंची आणि अश्या अनेक जणांची गोष्ट वाचताना हा विचार करूयात की सध्याच्या अशाच एका आनंदी बाईंच्या लढ्यामध्ये आपण विरोधी भूमिकेत नाही ना? आपल्याला एखादे तत्व पटत नसेल, किंवा आचरणात आणता येत नसेल, पण डोळस विचार केल्यास इतके नक्की कळत आहे की येणाऱ्या पिढीसाठी तेच हिताचे आहे तर आपण त्यांच्यावर बंधन का टाकावे? पण कदाचित टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही, आणि म्हणूनच विरोध करणारा समाज अप्रत्यक्ष रित्या बदल घडवण्यात सहभागी होतो!