सायकलवरचा पर्यावरणदिन !! – 1
भाग १
लहानपणी मी रोज शाळेत सायकलनेच जायचो. तेव्हापासून सायकलने इकडे तिकडे फिरायचो, मधूनच सिंहगड, लोणावळा, ताम्हिणी अश्या ठिकाणी सायकलवरून फेरफटका मारून यायचो. पण शाळा संपवून कॉलेज ला गेल्यापासून माझी सायकल अन त्यावरून हुंदडण कुठेतरी मागे राहून गेलं. तसच शाळेत असताना कराटे, किक बॉक्सिंग सुद्धा खेळायचो ते सुद्धा बंद झालं. त्यामुळे व्यायाम अन सायकल दोन्ही बंद होतं. आतमधून कुठेतरी जाणवायला सुरवात झालेली की काहीतरी चुकतंय. तंदुरुस्तीचे तीन तेरा वाजले होते. कळतंय पण वळत नाही असं चालू असताना एक दिवस अचानक माझं आणि अनय चं ठरलं की, उद्यापासून व्यायाम करायचा ( रोज ..!!). व्यायाम फक्त अन फक्त जिम मध्ये जाऊनच होतो असं नाही. आम्ही बागेत- सायकलिंग, धावणे, जोर, बैठका, सूर्यनमस्कार असा व्यायाम सुरु केला आणि चक्क तो सलग सुरु राहिला !!! तेव्हा आठवड्यातून एकदा सायकल वरून कुठेतरी चक्कर मारून यायचो. मग जसा व्यायाम वाढला तसं आमची सायकलिंग ची कक्षा सुद्धा वाढली. खडकवासल्या वरून लोणावळा, पानशेत, सिंहगड, ताम्हिणी इथपर्यंत मजल गेली. एकीकडे व्यायाम चालूच होता अन दुसरीकडे हे सायकलवरून फिरणे, गडांवर जाणे हे चालू होते. त्यातला तोरणा-राजगड हा ट्रेक विशेष लक्षात राहिला. आता हे सगळं केल्यावर आम्हाला पुढची ठिकाणं खुणावू लागली. आम्हाला आमच्या तंदुरुस्तीची परीक्षा घ्यायची होती. मग ठरलं की मुंबई ते कोतळूक ( गुहागर, जि. रत्नागिरी) अन पुन्हा कोतळूक-मुंबई असं ठरवलं.
ह्याआधी इतकं लांब कधी सायकलने गेलो नव्हतो त्यामुळे आम्हाला ह्याची तयारी कशी करायची ह्याची कल्पना नव्हती. त्यासाठी आम्ही केदार गोगटे, आशिष आगाशे ह्यांची मदत घेतली. त्यांनी आम्हाला असं सुचवलं की ज्या रस्त्याने जाल त्या रस्त्याने पुन्हा शक्यतो येऊ नका. मग आम्ही जरा विचार केला. गुगल भाऊंची ह्या कामात खूप मदत घेतली. आम्ही हळू हळू दक्षिणेकडे सरकलो. मग ठरलं गणपतीपुळे. पण वेंगुर्ल्याबद्दल थोडे ऐकून होतो म्हणून आता ठरलं वेंगुर्ला. आता वेंगुर्ला पर्यंत जातंच आहोत तर मग तिकडून पणजी ६० किलोमीटरच आहे ( फक्त!! ) मग म्हटलं येऊ पणजी पर्यंत जाऊन !! ठरलं आता फायनल मुंबई ते गोवा !!!! २९ मे ते ७ जून २०१७ …!!!!
जानेवारी मधेच तारीख अन ठिकाण ठरलेलं. आता मधले मुक्काम, राहण्याची सोय ह्याची तयारी सुरु केलेली तर दुसरीकडे सायकल दुरुस्ती साठी लागणारं साहित्य, इतर साहित्य ह्याची जमवा जमवं चालू होती. अन सर्वात महत्वाच व्यायाम !! रोज ३-४ तास व्यायाम चालू होता. रोज ३-४ किलोमीटर धावणे, पूल अप्स, डबलबार, पुशअप्स, जोर, बैठका, सूर्यनमस्कार अन हे सगळ झाल्यावर ४०-५० किलोमीटर सायकलिंग अन ह्या सर्व गोष्टींबरोबर पूरक आहार असा आमचा नित्यक्रम चालू होता. आमची रात्र ९.३० वाजता तर दिवस पहाटे ४.०० वाजता सुरु व्हायचा.
गम्मत अशी झाली होती आम्ही ज्या कालावधीत चाललो होतो, त्यात ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरणदिन म्हणून जगभरात साजरा केला केला जातो, हे आमच्या लक्षातच आलं नव्हतं !!
पर्यावरणाचा समतोल ढासळलेला आहे हे कटू सत्य आता आपण सर्वांनीच मान्य करायला हवं अन त्यासाठी पर्यावरणाचा समतोल पुन्हा कसा साधता येईल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. पर्यावरण संवर्धन ही फक्त बोलण्याची गोष्टं नसून कृतीची आहे. त्याकरिता आमचा प्रवास हा पर्यावरण संवर्धनाच्या कामात सहभाग म्हणून एक छोटासा प्रयत्न ठरला होता ह्यातून आम्हाला बर्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. काही चांगल्या काही वाईट, दोन्हीही !!!
म्हणता म्हणता २९ मे हा दिवस उजाडला. आमचा पहाटे २.३० लाच उजाडला. सगळी तयारी करून सायकल वरून पुणे स्टेशन गाठलं. सायकली रेल्वेत चढवून मग आम्ही डेक्कन क्वीन नी मुंबई ला जायला निघालो.
आमच्या ह्या प्रवासावर मान्सून चे सावट होतेच. मुंबई ला उतरल्यावर आम्हाला समजले की मांडवा ची जेटी समुद्र खवळलेला असल्याने रद्द झाली होती. मग आम्ही भाऊ च्या धक्क्यावरून मोरा-करंजा-रेवस असं करून संध्याकाळी ७ ला किहीम ला पोचलो.
रात्रभर व्यवस्थित विश्रांती घेऊन सकाळी आम्ही हरिहरेश्वर कडे जाण्यासाठी तयार झालो. किहीम वरून निघतानाच पावसाने बरसून आमचे स्वागत केले. आमचा आजचा मुक्काम हरिहरेश्वर ला होता. जवळपास १२५ किलोमीटर अंतर पार करायचं होतं. किहीम वरून निघाल्यावर अलिबाग, रेवदंडा झाल्यावर फणसाड च जंगल लागलं. संपूर्ण हिरवंगार !!!! वाटेत वानरांनी सुद्धा आमचं स्वागत केलं. पुढे काशीद, मुरुड करून आम्ही आगरदंडा ला पोचलो आता आम्हाला पलीकडे जाण्यासाठी जेटी होती. दिघी ला पोचल्यावर थोडी विश्रांती घेऊन ताजेतवाने होऊन आम्ही पुढे निघालो. एव्हाना दुपारचे ३ वाजून गेले होते. पुढे दिवेआगर, श्रीवर्धन करून संध्याकाळी ७ च्या सुमारास आम्ही हरिहरेश्वर ला पोचलो. आजचा प्रवास एकदम व्यवस्थित झालेला असल्याने आमच्या आत्मविश्वासात थोडीशी भर पडली. आता उद्या आमचा कोतळूक (ता. गुहागर) ला मुक्काम होता.
आज ३१ मे. सकाळी आम्ही लवकर आवरून ७ च्या सुमारास निघालो. हरीहरेश्वरपासून ते वेसावी पर्यंत संपूर्ण हिरवागार परिसर होता. त्यात रात्री पाऊस होऊन गेल्याने सगळीकडे एकदम प्रसन्न वातावरण पसरलेलं होतं. वेसावी कडे जायला बोटीत सायकली ठेवल्या. हे सावित्री नदीचं पात्र होतं. बघूनच डोळे गरगरतील. गेल्यावर्षी झालेल्या महाड दुर्घटनेचं स्मरण आम्हाला झालं.
आता आम्ही रायगड जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश केला होता. आता खरी मजा सुरु झाली होती. कोकणातले खरे चढ आता सुरु झाले होते. त्यात पाऊस अधूनमधून हजेरी लावत होता. संपूर्ण घाटरस्ता होता. वाटेत वेळास हे गाव लागलं. हे गाव कासव संवर्धनासाठी ओळखलं जातं. इथे दरवर्षी कासव महोत्सव भरवला जातो. सह्याद्री निसर्ग मित्र, कासव मित्र मंडळ, ग्रामपंचायत, वनविभाग अन सर्वात महत्वाचं स्थानिक ग्रामस्थ ह्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नामुळे हा प्रयोग राबविला जात आहे. दुर्मिळ होत चाललेल्या ‘ऑलिव्ह रिडले’ ह्या कासवाच्या प्रजातीचे संवर्धन ह्या प्रयोगाच्या माध्यमातून यशस्वीपणे होत आहे.
वेळास ते भारजा च्या खाडी पर्यंत संपूर्ण घाटरस्ता जंगलातून होता. रस्त्यावर पूर्ण शांतता. पक्ष्यांचा किलबिलाट ( नेहमीचे कावळे, पारवे सोडून जरा वेगळे!!!). भारजा च्या खाडी च्या इथे बॉक्साइट च्या खाणी आहेत. इथून बॉक्साइट ची निर्यात होते. पुढे केळशी, हरणे, मुरुड, लाडघर लागले. संपूर्ण किनारी रस्ता. एकीकडे फेसाळणारा समुद्र अन एकीकडे आम्ही, असा आनंद घेत आम्ही लाडघर ला पोचलो. इथून पुढे दाभोळ पर्यंतच्या रस्त्याने आमचा चांगलाच घाम काढला होता. आता आम्हाला जेटी करून वशिष्ठी नदीचे पात्र पार करायचे होते. आमचा शेवटचा एक तासाचा प्रवास संपूर्ण अंधारातून झाला. वाटेत संपूर्ण काजव्यांनी केलेली नैसर्गिक रोषणाई आम्हाला बघायला मिळाली. अखेर रात्रीच्या ८.१५ ला आम्ही कोतळूक ला पोचलो. उद्या विश्रांतीचा दिवस असल्याने आम्ही थोडे निवांत होतो.
आमचा पुढचा मुक्काम रत्नागिरी ला होता. एक दिवस संपूर्ण विश्रांती घेऊन ताज्या दमाने आम्हीं २ जून ला पुढच्या प्रवासासाठी निघालो. अतिशय सुंदर रस्ता होता. पण खरी मजा अशी होती की इथे आदल्या दिवशी पाऊस पडून गेल्याने सूर्य महाराज आकाशात अतिशय जोरदार तळपत होते !! आजचे अंतर कमी होते, अंदाजे ७०-७५ किलोमीटर. आम्ही जयगड, गणपतीपुळे करून पुढे आरे-वारे रस्त्याला लागलो. ह्या रस्त्याच कौतुक बर्याच दिवसांपासून ऐकत होतो, ते कौतुक का आहे हे तिथे गेल्यावरच समजले. अतिशय मस्त रस्ता (अन स्वच्छं), जोरदार वाहणारे वारे, एकीकडे अथांग समुद्र. ह्याचा मनमुराद आनंद घेऊन आम्ही पुढे निघालो. अखेर संध्याकाळी ५ च्या सुमारास आम्ही रत्नागिरीत पोचलो.
आता उद्याचा मुक्काम देवगड ला होता. अंतर साधारण ९०-९५ किलोमीटर होते. कोकणातला आधीचा प्रदेश अन हा प्रदेश संपूर्णपणे वेगळा आहे. रत्नागिरी देवगड रस्ता संपूर्ण पठारी प्रदेश आहे. रस्त्याला दूर दूर पर्यंत झाड नाही. जोरदार वाहणारे वारे, आकाशात तळपणारा सूर्य हे सर्वजण आमची परीक्षा घेत होते. रत्नागिरी जिल्हा आणि सिंधुदुर्ग जिल्हा ह्या प्रदेशांमधला आम्हाला फरक जाणवत होता. ह्या रस्त्यावर बर्याच ठिकाणी आंब्याच्या झाडांच्या कलमांची एकसुरी लागवड दिसून आली (व्यापारी वृत्ती). हळू हळू करत पोचलो आम्ही एकदाचे देवगडला संध्याकाळी ५ च्या सुमारास. आमचा पुढचा मुक्काम वेंगुर्ला ला होता.
आत्तापर्यंत आम्ही आम्ही जवळपास ४०० किलोमीटर अंतर पार केले होते. प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी आम्ही कोकणी जेवणाचा स्वाद घेतला होता. तसेच प्रत्येक ठिकाणच्या आंब्याची चव वेगळी होती. रत्नागिरीच्या आंब्याची चव तर अजून जिभेवर रेंगाळत आहे !! आता देवगड-वेंगुर्ला हा आमच्या प्रवासातला सर्वात कठीण असा रस्ता होता. सकाळी आम्ही लवकरच देवगड वरून निघालो. कुनकेश्वर च्या इथे झालेल्या नवीन पुलामुळे आमचे बरेच अंतर वाचले होते. हिंदळे, आचरा करून आम्ही मालवण ला पोचलो. दुपारचं जेवलो. पुढे आम्ही वेंगुर्ला साठी निघालो. वाटेत एका ठिकाणी रस्त्यावर एक वानर अपघातामुळे मृत्युमुखी पडलेले आम्हाला दिसले. बघून खूप वाईट वाटले आम्हाला. इथून पुढे प्रत्येक रस्ता आमच्या मानसिक क्षमतेची कसोटी पाहत होता. मधूनच तीव्र चढ, थोडे खराब रस्ते, मदत होती ती फक्त झाडांच्या सावलींची !! वाटेत चिपी येथे आंतरराष्ट्रीय विमानतळाच काम चालू असल्याने आम्हाला खूप वळसा पडला अन मुळात म्हणजे आम्हाला तिथे रस्ता कुठे दिसतोय का, हे बघावं लागत होतं !! पुढे परुळे, म्हापण करून वेंगुर्ला ला पोचलो. आता आमचा उद्या सुद्धा वेंगुर्ला मधेच मुक्काम होता.
सायकलवरचा पर्यावरणदिन !! – 2 हा लेख वाचण्यासाठी क्लिक करा