51 A व LetsRISE ची वेताळ टेकडीवरील यशस्वी ३ वर्षे!
To read the post in English – Click Here
टेकडीवर काम सुरू करण्यामागे दोन गोष्टी होत्या. पहिली नवीन वर्षाची सुरुवात कुठल्यातरी चांगल्या कामाने करणे. अन दुसरी म्हणजे राग! स्वतःवरचाच! प्रत्येक गोष्टीचा दोष सरकार प्रशासनाला दिलेला ऐकून आणि पाहून आम्ही कंटाळलो होतो. आता एक जबाबदार नागरिक म्हणून आपणही काहीतरी काम करण्याची जबाबदारी उचलावी असे आम्हाला वाटले. म्हणून आम्ही समविचारी लोकांसोबत हा उपक्रम पहिल्यांदा १ जानेवारी २०१७ रोजी चालू केला.
पहिल्या उपक्रमानंतर आम्ही विचारात पडलो. एकदा केलेली स्वच्छता पुरेशी आहे का? हा एक प्रयत्न पुरेसा होता का? आम्ही नागरीक असल्याची जबाबदारी पूर्ण करत होतो का? ह्या प्रश्नांची उत्तरं शोधताना आम्हाला जाणवलं की असे उपक्रम वारंवार व्हायला हवेत. आणि म्हणून आम्ही ठरवले की महिन्यातला किमान एक रविवार सगळ्यांनी ह्या कामासाठी द्यायचा.
आमचा विश्वास आहे की योग्य दिशेनी टाकलेले लहान पाउल देखील महत्वाचे असते. आपण सुरुवातीपासूनच थोडे थोडे पैसे साठवले कीत्याची पुंजी जमा होते ना? पण त्यासाठी वेळ लागणार म्हणून आपण पैसे साठवणे थांबवतो का?
आम्ही मित्र मैत्रिणींनी हा उपक्रम सुरु केला होता. पण जास्तीत जास्त लोकांनी ह्या उपक्रमात सहभागी व्हावे ह्यासाठी whatsapp, facebook अश्या माध्यमांचा उपयोग केला. ह्यातली अनेक लोकं आज ह्या उपक्रमाचा फक्त अविभाज्य भागच नाही तर आमचे चांगले मित्र देखील झाले आहेत. स्वच्छतेच्या उपक्रमापासून केलेली सुरुवात पुढे वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनापर्यंत पोचली. तुम्हाला आपल्या उपक्रमाची अधिक माहिती खालील लिंक वर मिळेल.
१ जानेवारी २०१८ ला आम्ही पहिला वर्षपूर्ती सोहळा साजरा करायचे ठरवले. पण काही कारणांमुळे शक्य होऊ शकले नाही. पण ह्या वर्षी तिसरा वर्षपूर्ती सोहळा आम्ही २६ जानेवारी रोजी करायचा ठरवला. आम्ही आतापर्यंतच्या सर्व कार्यकर्त्यांना बोलावले. तसेच आम्ही नवीन लोकांनाही सहभागी होण्याचे आवाहन केले. ह्या उपक्रमाचे प्रमुख पाहुणे होते आमचे गुरु प्राध्यापक श्री. द. महाजन. त्यांना आम्ही आपलेपणानी बापू म्हणतो. त्यांनीच आम्हाला सुरुवातीपासून कोणती झाडे लावावीत व त्याचा संवर्धनाविषयी मार्गदर्शन केले होते.
26 जानेवारीच्या उपक्रमासाठी जवळपास ४५-५० जणांनी हजेरी लावली. सर्वजण उत्स्फूर्तपणे काम करत हकते. उपक्रमासाठी आम्ही दोन गट केले होते. गट ‘अ’ वृक्षसंवर्धनासाठी गेला. तर गट ‘ब’ स्वच्छतेसाठी गेला.
आम्ही वेताळ बाबा मंदिराभोवतीचा सगळं भाग स्वच्छ केला. BMCC व Fergussion कॉलेजच्या काही विद्यार्थ्यांनी खूपच उत्साहात काम केले. भारताचे भविष्य उज्वल का आहे ह्याची एक झलक त्यांच्या कामातून दिसत होती.
२०१७ पासूनच आमच्यासोबत स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा एक गट काम करत आहे. ते सर्व आज पण आले होतेच. त्यांच्या कामात नेहमी एक वेगळ्याच प्रकारचा जोश असतो. असच जोशात काम करता करता ह्या गटाचं नामकरण ‘मतदारसंघ’ असं केलं आहे.. सगळ्यांनी मिळून साधारण १०० किलो कचऱ्याचे धन गोळा केले.
गट अ दुसरीकडे झाडांना पाणी, खत देणे, वाळलेले गवत कापणे, झाडांभोवती गोलाकार खड्डा करणे, अशी झाडं जपण्यासाठी जी कामं आवश्यक असतात ते करत होता.
योगायोग म्हणजे आदल्या दिवशीच झाडांच्या आजूबाजूला आग लागली होती. बरेच गवत जळले होते. पण एकाही झाडाला आगीची झळ पोचली नव्हती. त्यामुळे उपक्रमाच्या दिवशी एका प्रकारे वृक्ष संवर्धनाचे महत्व दिसून आले. त्याबद्दल लोकांनी एकमेकांत गप्पा मारल्या. दोन कार्यकर्त्या त्यांच्या नर्सरी मधल्या मुलांना सोबत घेऊन आल्या होत्या.
उपक्रम झाल्यावर दोन्ही गट आमच्या आधी जिकडे वृक्षलागवड केली आहे त्या जागेवर गेले. तिथे बापूंनी सर्वांना स्थानिक वृक्षांचे महत्व समजावून सांगितले. त्यांनी सोपी उदाहरणं देऊन आणि प्रश्न विचारून लोकांसोबत संवाद साधला. मग त्यांनी तिथे लावलेल्या ४,५ वृक्षांचा परिचय करून दिला. संस्कृतमधील वेगवेगळ्या सुभाषितांमधून त्यांनी माहिती दिली.
त्यानंतर सगळे अल्पोपहार करायला गेलो. तेव्हा बापूंनी चान्डोग्य उपनिषदातील जाबाल ची गोष्ट सांगितली. जाबालला ब्रम्हज्ञान प्राप्त करायचे होते. त्यासाठी त्याला गुरुंनी एक कार्य दिले. ते पूर्ण करताना त्याला कळले की ब्रम्हज्ञान म्हणजेच निसर्गज्ञान. अल्पोपाहाराची सोय सौरव सरांनी आणि Khaolite ने केली होती.
सगळ्या कार्यकर्त्यांनी एका प्रकारे त्यांच्या कामातूनच राष्ट्रगीत गायले. सुरुवातीपासूनच ह्या उपक्रमात अतिशय मेहनती कार्यकर्ते सहभागी आहेत. काजलने माहिती फलक बनवण्याची व तो झाडांच्या ठिकाणी लावण्याची जबाबदारी घेतली. तर अमित बोडकेचे लग्न एका आठवड्यावर आले होतं तरीही तो आला. जणू काही आधी लगीन कोंढाण्याच आणि मग माझं असं त्याच्या मनात असावं. संचितने संपूर्ण कार्यक्रमाचे छायाचित्रण केले. अनिल, समीर, अक्षय, अमित ह्यांनी उपक्रमाची जबाबदारी उत्कृष्टपणे पार पाडली.
सौरव सर या उपक्रमाचा कणा आहेत. त्यांची बायको इस्पितळात असतानाही त्यांनी थोडावेळ उपक्रमास येऊन काम केले. ह्यातूनच त्यांची कामाविषयीची आत्मीयता व जाणीव दिसून येते. हा उपक्रम लोकांचा आहे आणि त्यांच्या सहभागाशिवाय हे एवढे काम करणे शक्य नाही.
अशा उपक्रमातून आम्हाला आत्तापर्यंत काय मिळाले? स्वच्छतेच्या उपक्रमातून आम्हाला जबाबदारी, जाणीव आणि कचरा वर्गीकरण करण्याचे महत्व समजले . जी लोकं सहभागी होऊन कचरा उचलतात त्यांना सफाई कामगारांना कचरा उचलताना काय वाटत असेल हे समजते. माझी खात्री आहे सहभागी झालेले कार्यकर्ते कुठेही कचरा करत नसतील.
वृक्षसंवर्धन आपल्याला बरेच काही शिकवते. त्यातील शिकवणी तर आपल्याला रोजचे आयुष्य जगताना उपयोगी पडतात. २०१७ मध्ये आमची सगळी रोपं आगीत जळाली. तरी आम्ही आमच्याकडून प्रयत्न करत राहिलो, पाणी देत राहिलो. बघता बघता रोपांना पुन्हा पालवी फुटली. ह्या सर्व प्रवासाचे आम्ही साक्षीदार आहोत.
आपण रोजच्या जगण्यातल्या लहान सहान समस्यांना किती महत्व देतो. पण ह्या झाडांनी आम्हाला शिकवले की आयुष्यात आपल्यासमोर कुठलेही संकट कधीही येऊ शकते. तेव्हा स्वतःवरचा थोडासा विश्वास अन जिद्द असेल तर आपण त्यातून सहजपणे बाहेर येऊ शकतो. झाडे आपल्यात ही ताकद आणि सहनशीलता निर्माण करतात.
तुम्हाला माझा अनुभव कदाचित खरं वाटणारही नाही. तसे असल्यास मी तुम्हालाही आवाहन करतो कि हे सर्व अनुभवण्यासाठी एकदा आमच्या टेकडीवर याच! आग्रहाचं निमंत्रण!