HIBERNATION WITH OPEN EYES?
पर्यावरण समस्यांच्या बाबतीत माणूस निद्रिस्तावस्थेत…!!?? जागतिक पर्यावरण दिनानिमित्त गल्लीपासून UN पर्यंतच्या विविध समस्या-उपाययोजनांचा धावता आढावा व संवर्धनाच्या कामात आपला वैयक्तिक सहभाग.
दरवर्षी ५ जून हा जागतिक पर्यावरण दिन (World Environment Day) साजरा केला जातो हे आपल्या सर्वांना माहीत आहेच. यंदाची ‘थीम’ आहे ‘वायू प्रदूषण’. दरवर्षी जगात दुषित हवेमुळे जवळपास ७० लाख लोकांचा मृत्यू होतो. त्यात ४० लाख लोकं ही फक्त आशिया-पॅसिफिक भागातील आहेत. जगातील ९२ टक्के लोकांना श्वसनासाठी शुध्द हवा मिळत नाही तसेच वायुप्रदुषणामुळे जागतिक अर्थव्यवस्थेस दरवर्षी जवळपास ५ ट्रिलियन डॉलर्सचा फटका बसतो.
सध्या पर्यावरण हा गल्लीपासून जागतिक पातळीवर अति महत्वाचा मुद्दा ठरत आहे. अर्थात त्याला कारणेही तशीच आहेत. जागतिक तापमानवाढ, त्यामुळे दोन्ही ध्रुवांवरील वितळणारा बर्फ, जंगलतोड, वन्य प्राणी-पक्ष्यांची घटती संख्या, प्लास्टिक कचऱ्याचा प्रश्न अशा असंख्य गोष्टींमुळे पर्यावरणाचा समतोल सतत ढासळतोच आहे. अर्थात वेळीच मानवाच्या हे लक्षात आल्याने त्याने पर्यावरण संवर्धनाचे अनेक उपक्रम विविध पातळ्यांवर हाती घेतले. आधुनिक काळात पर्यावरण संवर्धनाची चळवळ रेचल कार्सन ह्यांच्या ‘द सायलेंट स्प्रिंग’ पासून सुरु होऊन Stockholm Conference 1972, Montreal Protocol, Earth Summit 1992 ते नुकताच मान्य झालेला पॅरिस करार इथपर्यंत चालूच आहे. तसेच संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकासाच्या ध्येयांची (Sustainable Development Goals) उद्दिष्टपूर्ती करण्यासाठी प्रत्येक देशाला स्वतःचा कृती आराखडा (Intended Nationally Determined Contribution) सादर करायचा आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या प्रयत्नांबरोबरच भारत सरकार देशपातळीवर अनेक योजना आणत आहे. त्यात अपारंपरिक उर्जेच्या वापरावर भर, इलेक्ट्रिक वाहन वापरास प्रोत्साहन (Fame India Scheme), वाहनांतून होणाऱ्या उत्सर्जनासाठी कडक निर्बंध ( BS Norms), तसेच ‘नमामि गंगा’ इत्यादी अनेक उपक्रम व कायदे सरकार आणत आहे.
परंतु हे सर्व प्रयत्न राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर होऊन पर्यावरणाची समस्या सुटणार आहे का? त्यावर कुणाचंही उत्तर अर्थात ‘नाही’ असंच येईल. वरच्या पातळीवर बनलेल्या कायद्यांचं यश-अपयश हे आपल्या सहभागावर अवलंबून आहे. जर आपला स्वतःचा वैयक्तिक पातळीवर कुठेच सहभाग नसेल तर कितीही कायदे, नियम बनले तरी ते अपुरेच आहेत !!
आपला सहभाग नोंदवण्यासाठी आपल्याला लगेच आपल्या सगळ्या गोष्टी सोडून फक्त ह्या कामात झोकून द्यायची आवश्यकता नाहीये. आपल्या बाकीच्या गोष्टी सांभाळूनसुद्धा आपण पर्यावरण संवर्धनाच्या कामात सहभागी होऊ शकतो. त्यासाठी गरज आहे ती आपल्या प्रबळ इच्छाशक्तीची.
स्थानिक पातळीवर सध्या आपण सगळेच अनेक पर्यावरणीय समस्यांना दररोज सामोरे जात आहोत. त्यात Heat Island Effect, दुषित हवा, बेसुमार वृक्षतोड, घनकचऱ्याचा प्रश्न, तसेच सध्या महाराष्ट्र राज्यात पेटलेला पाण्याचा प्रश्न अशी अनेक उदाहरणं देता येतील.
काही वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी, जर तिसरे महायुध्द झाले तर त्याची कारणे कुठली असतील याचा अभ्यास केला. त्यातील अनेक कारणांपैकी एक महत्वाचे कारण आहे – पाणी. जगात अनेक ठिकाणी प्रत्येक वर्षी पावसाचं प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येमुळे प्रत्येक माणसामागे पिण्याच्या पाण्याची उपलब्धता कमी होत आहे.
महाराष्ट्र राज्यापुरतं बोलायचं झालं तर यंदा पाण्याची स्थिती काय आहे ते पण रोज येणाऱ्या बातम्यांमधून पाहतच आहोत. गेल्यावर्षीपेक्षा धरणात पाणीसाठा कमी आहे. काही प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. तसेच गेल्या आठवड्यात पाणीचोरीचा गुन्हा राज्यात दाखल झाला आहे. दोन गावांमध्ये पाण्यावरून दगडफेक झाली. ह्या सर्वातून पाण्याचं व्यवस्थापन किती आवश्यक आहे याची प्रकर्षाने जाणीव होते. त्यामुळे पाणी हे जबाबदारीने कसं वापरता येईल यासाठी आपण प्रयत्न करणे आवश्यक आहे. परंतु एवढं असूनसुद्धा शहरात अनेक ठिकाणी पाण्याचा बेसुमार वापर होताना दिसतो. शहरात राहणाऱ्या नागरिकांनी आपल्या पाणी वापरण्याच्या पद्धतीचं परीक्षण करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. त्यातूनच कदाचित आपण खरंच बेसुमार वापर करतोय अशी जाणीव निर्माण होईल अन मग पाण्याचं नियोजन, वाचविण्याच्या नवनवीन पद्धती आपल्याला गवसतील.
THA-CAR– ठकार
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात मी आणि अक्षय डेक्कनला भेटलो होतो. डेक्कनच्या चितळे बंधूंच्या दुकानाच्या इथे खाद्यपदार्थांच्या ज्या गाड्या आहेत ती आम्हा मित्रांची भेटण्याची हक्काची जागा आहे. सोबतीला दत्ताभाऊचा चहा व मालपाणी क्रीमरोल लागतोच. अर्थात आम्हाला चहाबरोबर क्रीमरोल पुरतो! चहाच्या प्रत्येक घोटाबरोबर चर्चादेखील खोल व्हायला लागते. अशीच चर्चा रंगलेली असताना त्याच्या डोक्यात असलेली एक कल्पना मांडली. त्या कल्पनेत फार काही विशेष, जगावेगळ नव्हतं.
आपण सगळेच वॉशिंग सेंटरमध्ये गाड्या धुताना पाहतो. काही जण तर नळी लावून आपली गाडी धुतात. ह्यात वेगळं काय आहे? हे आपल्याला दिसणारं नेहमीचं चित्रं आहे. एकतर ह्यात आपल्याला काही वावगं वाटत नाही अथवा काही चुकीचं घडतय ह्याची जाणीव नसते. किंवा जरी जाणीव असेल तरी ह्यात मी काय करणार? एकट्याने थोडीच काही बदलणार आहे? एवढंसं पाणी गेल्याने असं काय नुकसान होणार आहे? अशा अनेक गोष्टींनी आपण स्वतःची समजूत काढून आपल्यासमोर घडणाऱ्या चुकीकडे दुर्लक्ष करतो.
पण आता अक्षयला ह्यात वेगळं काय दिसलं? त्यानेदेखील आपण जे रोज पाहतो तेच पाहिलं. पण तो तेवढ्यावरंच थांबला नाही तर पुढे जाऊन वॉशिंग सेंटरमध्ये अथवा नळीचा वापर करून गाडी धुतली तर किती पाणी वापरल जातं ह्याचा हिशोब काढला. आपण जर नळीने गाडी धुतली तर सर्वसाधारणपणे १ मिनिटात ३७.८५ लिटर पाणी वापरल जातं. १० मिनिट नळी चालू ठेवली तर तर ३७८ लिटर पाणी वापरलं जातं. एवढं पाणी, ते सुद्धा फक्त एका गाडीसाठी! वॉशिंग सेन्टरमध्ये देखील एका चारचाकीसाठी साधारणपणे ४०० लिटर पाणी वापरलं जातं. ह्या आकडेवारीनी अक्षयला अस्वस्थ केलं. त्याला डोळ्यांनी हे नुसतं बघत राहणं पटलं नाही. त्यामुळे यासाठी काय करता येईल यासाठी त्याने प्रयत्न सुरु केले.
त्याने इंटरनेटवर कमीत कमी पाण्यात गाडी कशी धुता येईल यासाठी शोध घेतला. काही दुकानांमध्ये जाऊन आला. मग त्याला जी वस्तू हवी होती ती सापडली एकदाची. कीटकनाशक फवारण्यासाठी जो पंप वापरला जातो त्यात त्याने थोडा बदल करून गाडी धुण्यासाठी सुरु केला. अक्षय ह्या समस्येकडे नुसता पाहत बसला नाही किंवा त्याने कुणाला दोषही दिला नाही. पण ही समस्या कशी सोडवता येईल ह्यासाठी प्रयत्न केला अन त्यातूनच ‘THA-CAR – ठकार वॉशिंग सेंटर’ ची सुरवात झाली. डिसेंबर २०१८ पासून सुरु झालेला प्रवास यशस्वीपणे चालू आहे. अक्षय एक चारचाकी धुवायला फक्त २ लिटर पाणी वापरतो. त्याने डिसेंबर २०१८ ते मे २०१९ च्या दरम्यान फक्त ४,४६४ लिटर पाणी वापरलं आहे. जर त्याने सध्या ज्या पद्धतीने गाड्या धुतल्या जातात ती पद्धत वापरली असती तर त्याला २६,७८४ लिटर पाणी लागलं असतं. त्याने जवळपास २२,३२० लिटर पाणी वाचवलं आहे. ही आकडेवारी आपण गाड्या धुताना किती पाणी वाया घालवतो हे सांगायला पुरेशी आहे.
अक्षय पुण्याचा आहे. सध्या त्याच्या वॉशिंग सेंटरची सेवा भारती विद्यापीठ परिसरात चालू आहे. तो स्वतः कायद्याचा विद्यार्थी आहे. एवढा शिकलेला असूनसुद्धा त्याला गाडी धुण्याचं काम कुठेच कमीपणाचं वाटत नाही. त्याच्याबरोबरच त्याच्या आई वडिलांनासुद्धा त्यांच्या मुलाने हे काम करण्यात कुठे कमीपणा वाटत नाही. उलट त्यांचा अक्षयला ह्या कामात पाठिंबा आहे ही सर्वात महत्वाची गोष्टं. ह्या कामातून कितीतरी पाणी वाचवता येतंय ह्याचं समाधान अक्षयच्या चेहऱ्यावर दिसून येतं. त्याला ह्या कामातून समाजातील काही वंचित गट आहेत त्यांच्यासाठी रोजगार कसा उत्पन्न करता येईल ह्यासाठी प्रयत्न करायचा आहे. त्या दिशेने त्याचे प्रयत्न सध्या चालू आहेत. सध्या आपण अनेकजण नोकरीच्यामागे धावताना दिसून येतात, तिथे एखादी कल्पना हटके पद्धतीने प्रत्यक्षात उतरवून रोजगार कसा निर्माण करायचा ह्याचं एक उत्तम उदाहरण आहे.
आपण शिकतो म्हणजे नक्की काय शिकतो? एक पदवी मिळाली की आपण अमुक काम करत नसतो वैगेरे आपल्याला कानावर येत असतं. पण काही अपवाद जे असतात त्याला अक्षय ठकार नक्कीच पात्र ठरतो. कारण त्याला एखादी गोष्टं दिसते, खटकते, अस्वस्थ करते, त्यावर तो उपाय शोधून काढतो अन समस्या सोडवायचा प्रयत्न करतो. तसेच हे सगळं करत असताना त्याची पदवी, शिक्षण कुठेच आड येत नाही. उलट कायद्याच्या शिक्षणानेच त्याला एखाद्या गोष्टीकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहायला शिकवलं असं तो म्हणतो. हे ऐकल्यावर त्याला त्याच्या कामात पुढे नक्कीच यश मिळेल असा विश्वास वाटतो.
अनेक शहरात बऱ्याचदा भरपूर पाणीपुरवठा होत असल्याने कदाचित दुष्काळाचे तितके चटके, त्याची दाहकता शहरी माणसाला आत्ता कदाचित जाणवणार नाही. परंतु जर शहरतील नागरिकांनी जर आपल्या पाणी वापरायच्या सवयींमध्ये जर बदल केला नाहीत तर भविष्यात शहरांना देखील दुष्काळाचा तडाखा बसल्याखेरीज राहणार नाही. गरज आहे ती आपण सर्वांनी वेळीच शहाणे व्हायची, अक्षयसारखे पाणी बचतीचे नवनवीन उपाय शोधून काढण्याची. मला खात्री आहे जोपर्यंत आपल्या देशात, समाजात अक्षयसारखे नागरिक आहेत तोपर्यंत आपण पर्यावरणाच्या विविध समस्यांवर हटके पद्धतीने नक्कीच मार्ग काढू शकतो. फक्त एक दिवस पर्यावरण दिन साजरा करणं पुरेसं नाहीये तर गरज आहे ती उरलेले सर्व दिवस आपल्या सर्वांच्या इच्छाशक्तीची व एकमेकांच्या सहकार्याची..!!
काय मग होताय ना तुम्ही सहभागी?
India doesn’t need more thinkers any more, it needs more doers.
– Anshu Gupta (Ramon Magassayssay Award winner 2015)
अक्षयच्या कामाबद्दल आपणास अधिक जाणून घ्यायचं असल्यास आपण त्याच्याशी थेट संपर्क साधू शकता.
भ्रमणध्वनी :- 9923636053
ईमेल :- akshay.thakar22@gmail.com