
सम विरुद्ध विषम
मूळ मुद्दा हा आहे की सध्याच्या काळात अशी विधाने नैतिकतेला धरून आहेत का?
काही वर्षांपूर्वी माझ्या परिचयातील एक व्यक्ती मुलगा होण्यासाठी खूप प्रयत्नं करत होती. एका गुरूंनी सांगितल्यानुसार काढे घेऊन झाले, पूजा-उपवास करून झाले. देव दर्शन यात्रादेखील पूर्ण झाली. प्रयत्नाअंती त्यांना मुलगी झाली. अखेरीस सासूच्या दबावामुळे व मनापासून आराधना न केल्यामुळे प्रयत्नं असफल झाला असा निष्कर्ष काढला गेला.
मनूने गर्भधारणेविषयी बरेच काही लिहून ठेवले आहे. त्याच्यानुसार स्त्री संग किंवा संभोग सम तिथीला झाल्यास मुलगा होतो तर विषम तिथीला झाल्यास मुलगी होते. ‘गर्भाधान‘ विधीमध्ये असे करता येऊ शकते. आयुर्वेदातसुद्धा मुलगा होण्यासाठी श्वासोछ्वासवर आधारित उपाय सांगितले आहेत.
इंदुरीकर महाराजांच्या मते भागवत धर्मात आणि ज्ञानेश्वरीतही मुलगा होण्यासाठी हेच उपाय सांगितले आहे आणि तेही हेच सांगत आहेत.
हिंदू धर्मातल्या १६ संस्कारांपैकी एक संस्कार म्हणजे ‘पुंसवन’. या संस्काराची पाळेमुळे आपल्याला अथर्ववेदात सापडतात. बृहदारण्यक उपनिषदाच्या ६.४.१७-६.४.१८ मध्येही, होणाऱ्या मुलाचे लिंग ठरवता यावे यासाठी मंत्रोपचार व विधी सांगितले आहेत.
इतर मुख्य धर्मांचे या मुद्द्यावरचे मत बघितले तर इस्लाम धर्मानुसार लिंग हे सर्वोतपरी अल्लाहचा निर्णय आहे. तरी काही इस्लामी देश लिंगं ठरवण्याच्या आधुनिक पद्धतींचा स्वीकार करतात. ख्रिश्चन धर्मातसुद्धा साधारण असेच सांगितले आहे.
अनेक धर्म व धर्मग्रंथांमध्ये मुलगा होण्यासाठी काय करावे ह्याचे उपाय दिले आहेत. तसेच ते कसे विज्ञानाला अनुसरून आहे ह्याचं सखोलपणे विवेचन केलं आहे . अनेक लोकांनी त्यास दुजोरा देत त्यावर भाष्यं देखील केलं आहे. परंतु सध्याच्या भारतीय कायद्यात लिंगनिदान तपासणी व स्त्री भ्रूण हत्या हे गुन्हा ठरवलेलं आहे तसेच तसं करणारी व्यक्ती शिक्षा व दंडास पात्र आहे.
धर्मातील उपाय चूक की बरोबर हा माझ्या मते महत्वाचा मुद्दा नाही. तसेच सम-विषम समीकरणासारखी विधानं तर्कशुद्ध आहेत की नाही ह्यासाठी संशोधन होणे आवश्यक आहे. परंतु मूळ मुद्दा हा आहे की सध्याच्या काळात अशी विधान नैतिकतेला धरून आहेत का? नैतिकता-अनैतिकता स्थळ-काळानुसार बदलत असते.
जे आपल्या देशात सध्या नैतिक असेल तेच दुसऱ्या देशात कदाचित नसेलही. याचे आपण एक उदाहरणच घेऊयात. लिंगनिदान तपासणी अमेरिकेसारख्या देशात मानवाधिकाराचा विषय आहे. त्यांच्या मते आपल्याला हवे ते अपत्य होण्यासाठी उपाय करणे हा मानवाधिकाराचा भाग आहे.
परंतु तेच आपल्या देशात लिंगनिदान हा कायद्याने गुन्हा आहे. कारण आपल्याकडे वंशाचा दिवा म्हणजे मुलगाच. आता तो मुलगा नंतर काय दिवे लावतो हा विषय वेगळा. परंतु त्या ‘दिवा’ प्राप्तीसाठी स्री-भ्रूण हत्या करणाऱ्यांची आपल्या देशात कमी नाही. त्यामुळेच आपल्या देशात पोटात असलेल्या तान्ह्या स्त्री-अर्भकाच्या मानवाधिकारांना अधिक महत्वं प्राप्तं होतं.

मुळातच हे ज्ञान घेऊन मुलगा होण्यासाठी प्रयत्नं का करायचे? जोपर्यंत ह्या विचारांची चलती आहे तोपर्यंत अशाप्रकारचे मार्ग, उपाय शोधले जाणारच. त्याहून अधिक महत्वाचं म्हणजे लोकांचाही ह्या सगळ्या गोष्टींवर असलेला विश्वास. ह्यामागचे मुख्य कारण म्हणजे पूर्वीपासून सांगत आलेल्या, चालू असलेल्या गोष्टींचा कुणीतरी अभ्यास केला असेलच हा विश्वास आणि श्रद्धा !
ग्रंथात लिहिलेल्या गोष्टी ऋषीमुनी तोंडी बोलत असत. ‘लिहायची पद्धत रूढ होण्याआधीपासून ऋषीमुनींचा अभ्यास होता आणि ती परंपरा २ हजार वर्ष चालत आली आहे म्हणजे त्यात तथ्य असणारच’ असा दाखला देऊन लोकं बऱ्याच विचारांचे समर्थन करतात.
ह्याचीच दुसरी बाजू अशी आहे की, आपणच आपले लोकप्रतिनिधी निवडून देतो. ते कायदे बनवतात आणि आपणच त्याचे अशा काहीतरी गोष्टींचा दाखला देऊन व प्रसार करून अवहेलना करतो. लोकप्रतिनिधींनी बनवलेल्या कायद्यांची अवहेलना ही अप्रत्यक्षरीत्या स्वतःचीच केलेली अवहेलना आहे ह्याचा मात्र आपल्याला विसर पडतो. धर्माच्या कायद्यांसमोर हे कायदे निष्प्रभ ठरतात व लोकांच्या मनात त्याची किंमत शून्य होते.
हे असं होणं साहजिकच आहे म्हणा ..अनेक वर्षांच्या तपश्चर्येनंतर सिद्धीप्राप्ती झालेल्या सिद्धपुरुषाच्या कुठल्याही गोष्टीस लोकांनीच निवडून दिलेल्या नेत्यापेक्षा जास्त मान मिळतो. हे कायद्याचं राज्य आहे. निवडून दिलेल्या सरकारमधील अभ्यासू नेत्यांसोबत एकत्र काम करून कायदे बनवण्याच्या प्रक्रियेत आपण स्वतः सहभागी होऊ तेव्हा कायद्याला महत्व मिळेल. धर्म म्हणजे कायदा आणि कर्तव्य! आणि ह्या अर्थाने स्वतंत्र भारतीय नागरिकांचा धर्म – संविधान.
त्यामुळे अश्या सिद्धपुरुषी कायद्यांपेक्षा सध्याच्या तार्किक व चालू काळास गरजेच्या कायद्यांचं महत्वं आपणच वाढवायला हवं . त्यासाठी आपण आधी स्वतःमध्ये डोकावून एकदा बघितले पाहिजे. अशा कायद्यांचा प्रसार केला पाहिजे. PCPNDT Act ( Pre-Conception and Pre-Natal Diagnostic Techniques Act, 1994 ) नुसार अशी विधाने कायद्याने गुन्हा आहेत. कारण अशा विधानामुळे अपत्य म्हणजे मुलगा ह्या विचारांस खतपाणी मिळते. त्यामुळे ही विधाने अनैतिकसुद्धा ठरतात.

‘अपत्य म्हणून मुलगा हवा असेल तर स्त्रीने नवऱ्याच्या उजव्या बाजूला झोपून उजव्या नाकपुडीने श्वास घ्यावा’ ही श्रद्धा-अंधश्रद्धा नंतरचा भाग परंतु हा असा विचार करण्यामागचा मूळ दिव्यं विचारच प्रश्नचिन्ह आहे.
मुलगाच हवा ! का? कशासाठी ? ह्याचे उत्तर मुलगा-मुलगी एकसमान हा विचारच देऊ शकतो. अन तोच विचार हे असले भन्नाट उपाय देणाऱ्यांची दुकाने नक्कीच बंद पाडू शकतात!
तुम्हाला हा लेख आवडला असल्यास खाली नक्की कमेंट करा व इतरांना शेअर करून अर्थपूर्ण चर्चा सुरु करा! असेच आणखी लेख वाचण्यासाठी वेबसाईटला सबस्क्राइब करा!
संपादन व मुद्रितवाचन(Proofreading) – हिमांशु कुलकर्णी

