51A

WE THE PEOPLE OF _ _ _ . ARE WE ???

भाग 2/2

आपलं घर !!!

श्री.विजय फळणीकर व श्रीमती साधना फळणीकर यांनी त्यांच्या मुलाच्या स्मृतीप्रित्यर्थ “आपलं घर” ही संस्था २००१ मध्ये स्थापन केली. संस्थेच्या कामाची सुरुवात समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकास मोफत रुग्णवाहिकेची सेवा पुरवण्यापासून झाली. २००२ मध्ये आर्थिकदृष्ट्या मागास अनाथ मुलांसाठी घरं सुरु झालं. २००७ मध्ये डोणज्यात निराधार मुलांसाठी/व्यक्तींसाठी घर, व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र, ग्रामीण रुग्णालय सुरु करण्यात आलं.

आपलं घर मधील कार्यकर्त्या.

आम्ही तेजरावांना घेऊन ‘आपलं घर’ मध्ये पोचलो. तिथली मुलं तेव्हा खेळत होती. आम्ही जेव्हा तेजरावांना गाडीतून उतरवलं तेव्हा ही सगळी मुलं त्यांच्याकडे बघायला लागली. थोड्या वेळाने तर लहान मुलं त्यांच्या जवळ येऊन त्यांच्याशी बोलायला लागली. पुढे तर त्या मुलांनी त्यांच्याबरोबर सेल्फी घेतला. किती दुर्मिळ दृश्य !! आम्हाला काही कळेना हे काय घडतय ते. तिथल्या कर्मचार्यांशी बोलल्यावर आम्हाला कळलं की तिथे जे निराधार वयोवृद्ध व्यक्ती येतात त्यांची काळजी घेण्याचं काम ही मुलंच करतात..!!! हे सगळं बघून आम्हाला बरं वाटलं. असही काही आजुबाजुला घडू शकतं यावर विश्वास बसला.

Ivanka Trump चा भारत दौरा : India vs भारत

आम्ही आपलं घर मधून तेजरावांना सोडून निघालो. अर्ध काम झालं असलं तरी मनात थोडी धाकधूक होतीच. एकतर सगळी जबाबदारी आम्ही आमच्यावर घेतली होती. ह्याआधी अश्या प्रकारचा अनुभव नसल्यामुळे पुढे काय होणार काहीच माहित नव्हतं. डोक्यात बरेच प्रश्न. जोखीम पत्करली होती. आता उडी मारलीच आहे तर ह्याचे जे काही परिणाम होतील त्याला सामोरे जायला आम्ही तयार होतो. आता आनंदराव ( तेजरावांचा मुलगा) ह्याची वाट पाह्ण्यापालीकडे आमच्या हातात काहीच नव्हतं.

आपलं घर मध्ये – तेजराव

के. आनंदराव ८ तारखेला संध्याकाळी त्याच्या अम्माबरोबर पुण्याकडे यायला निघाला. पुण्यात पोचायला सकाळ उजाडणार होती. ९ तारखेला सकाळी के. आनंदराव व त्याची आई पुण्यात पोचले. अनयचं कॉलेज असल्याने त्याला यायला वेळ होता. तोवर त्यांना माझ्या घरी घेऊन गेलो. दोघांच्याही चेहऱ्यावर तेजरावांना कधी एकदा भेटतोय असं झालं होतं. अस्वस्थता, बैचेन, घालमेल त्यांना भेटण्याची आतुरता ह्या सगळ्या भावनांचा मिलाफ मला त्यांच्या चेहऱ्यावर बघायला मिळाला. अनय येईपर्यंत मी त्यांनी आणलेली कागदपत्रे, पोलीस तक्रार केल्याची प्रत सर्व पाहून घेतलं. माहिती घेतली हे सगळं नेमकं झालं कसं?

तेजराव व त्यांची पत्नी ‘पलासा’ ह्या गावात ‘साईसदन’ आश्रमात काम करतात. अम्मा तिथल्या सगळ्यांसाठी स्वयंपाक बनवतात. तेजरावांच्या डाव्या गुढघ्यात थोडी समस्या असल्याने त्यांना जास्तं चालता येत नाही त्यामुळे ते तिथे असलेल्या गाईंना चारा देणं वैगेरे थोडी शारीरिक रित्या हलक्या स्वरुपाची काम करतात. त्यांचा मुलगा म्हणजे के. आनंदराव, त्याची बायको अन त्यांचा मुलगा हैदराबाद ला राहतात. आनंदराव तेथे बांधकामक्षेत्राशी निगडीत काहीतरी काम करतो जे मला जास्तं कळलं नाही.

तर झालं असं, तेजराव त्यांच्या मुलाकडे काही दिवस राहायला, हैदराबादला आले होते. त्यांच्यासाठी हे शहर खूप मोठं होतं. संपूर्ण आयुष्य त्यांनी त्यांच्या गावात ‘गोपिली’ व ‘पलासा’ येथे घालवले आहे. तेजराव व अम्मा दोघांचही शिक्षण झालेलं नाही. त्यामुळे तेजरावांना तेलुगु बोलणं सोडलं तर काही लिहिता वाचता येत नाही. आता गावाकडे परतण्याचा दिवस जवळ आला होता. त्यांच्या घराजवळ त्यांचे काही गाववाले राहत होते, त्यांना भेटून घ्यावं म्हणून ते आनंदरावला सांगून गेले ते घरी परतलेच नाहीत.

तेजरावांना त्यांच्या मुलाचं घर सापडेचना. त्यामुळे ते गावाकडे परत जावं म्हणून रेल्वेस्थानकावर गेले. त्यांना लिहिता वाचता कुठे येतंय ? त्यांना हैदराबाद वरून गावापर्यंत थेट रेल्वे नाही, २ रेल्वे बदलून जाव्या लागतात. तर ते पहिल्या रेल्वेत बरोबर बसले होते. त्यांची दुसरी रेल्वे चुकली अन आले थेट पुण्यात! आनंदराव ने हैदराबाद मध्ये पोलीस तक्रार नोंदवली. रोज सकाळी कामाला जायच्या आधी तो ठिकठिकाणी तेजरावांचा शोध घेत होता. संपूर्ण हैदराबाद त्याने पालथं घातलं. ठिकठिकाणी त्याचे वडिल हरवल्याची पोस्टर्स लावली. तीन- साडेतीन महिन्यात जवळपास त्याने ८०,००० रुपये खर्च केले होते. पण काही तपास लागेनात.

गावाकडचे मदत करायची सोडून उलटं ह्यालाच टोमणे मारायला लागले. त्याच्यावर आरोप व्हायला लागले की तूच आला असशील बापाला सोडून, बाप जड झाला असेल वगैरे. स्थळ व भाषा वेगळ्या असल्या तरी मानवी वृत्ती किती समान आहे ह्याचं दर्शन मला घडलं. एकीकडे आनंदराव व त्याच्या घरच्यांना अन्न, पाणी गोड लागेना. तेजरावांचं काय झालं असेल ह्याच्या चिंतेत, मनात काय काय अन किती वेळा किती प्रकारच्या शंका येऊन गेल्या असतील ह्याची गणतीच नाही.

एवढी सगळी माहिती आनंदरावने मला दिली. हे एवढं सगळं असू शकत ह्याचा आपण इथे बसून विचारसुद्धा करू शकत नाही. पण हे वास्तव होतं. ह्यावरून साक्षरता किती महत्वाची आहे ह्याची मला प्रकर्षाने जाणीव झाली. त्यांना किमान वाचता येत असत तरी हे एवढं सगळं घडलं नसतं. पण ही कथा एवढ्यावरच थांबत नाही. एव्हाना अनय आला होता आम्ही सगळे आपलं घर कडे जायला निघालो. गाडीतसुद्धा त्यांची अस्वस्थता आम्हाला जाणवत होती. सकाळी घराबाहेर गेलेला आपला माणूस जर संध्याकाळपर्यंत घरी नाही आला तर आपलं काय होतं…?? इथे तर तीन-साडेतीन महिने त्यांना काय झालं असेल? त्यांचं दुख, वेदना, मानसिक ताण याचा आपण इथे बसून विचार करू शकतो का? एकीकडे विचारांचं चक्र चालूच होतं.

काही वेळात आम्ही आपलं घर मध्ये पोचलो. तेजरावांना आणायला मी, अनय अन तेथील एक कर्मचारी आत गेलो. त्यांना बाहेर आणल्यावर जेव्हा तिघांची भेट झाली त्या प्रसंगाचं शब्दात वर्णन करणे अवघडे. इतक्या महिन्यांची त्यांना भेटण्याची आतुरता, वाटत असलेली काळजी, मनात येऊन गेलेले सगळे विचार या सगळ्याचं रुपांतर अम्मांच्या डोळ्यात अश्रू येऊन झालं. अम्मांना काय बोलू अन काय नको असं झालं. तेजरावांना तर हे सगळं घडतंय ह्यावर विश्वासच बसत नव्हता. थोड्यावेळाने आनंदराव त्यांच्याकडून आणखी माहिती घ्यायला लागला नक्की हे सगळं कसं घडलं ह्याची.

कुटुंब एकत्र आल्यावर…

तेजरावांनी जे सांगितलं ते ऐकून आपण किती आभासी आयुष्य जगतोय ह्याची जाणीव झाली. आपल्याला आजूबाजूला सगळं किती व्यवस्थित चालू आहे असं आपल्याला वाटत असत. आपल्याला स्वतःच्याच अडचणी इतक्या मोठ्या वाटत असतात त्यामुळे आम्ही स्वतःमध्येच इतके गुरफटलेलो असतो की आम्ही कधी आजूबाजूला काय चाललंय हे बघण्याची  तसदी सुद्धा घेत नाही. रस्त्यावर होणारे अपघात असोत किंव्हा आणखीन काही. मला काय करायचंय? मला काही झालंय का? अशी १०० कारण आपल्याकडे तयार असतात. पण आपल्याच आजूबाजूला काय घडू शकतं अन त्याचे परिणाम काय होऊ शकतात ते आम्हाला तेजरावांनी जे सांगितलं त्यावरून जाणवलं.

तेजराव त्यांच्या गाववाल्यांना भेटायला गेले नंतर त्यांना त्यांच्या मुलाच घर सापडेना म्हणून ते गावाकडे जायला निघाले परंतु ते तिथे पोचलेच नाहीत हे आम्हाला माहित होतं. हे जे सगळं चालू होतं तो महिना नोव्हेंबर होता. हैदराबाद मध्ये भारत जागतिक उद्योजकता परिषदेचं(Global Entrepreneurship Summit) आयोजन करत होता. प्रमुख अतिथी म्हणून अमेरिका राष्ट्राध्यक्षांच्या कन्या इव्हांका ट्रम्प उपस्थित राहणार होत्या. तसेच जागतिक स्तरावरची परिषद असल्याने आपल्या देशासाठी इज्जत का सवाल होता. ‘इंडिया शायनिंग’ म्हणून संपूर्ण प्रशासन परिषदेच्या कामात गुंतलं होतं. ‘इंडियाची’ प्रतिमा जागतिक स्तरावर अजून वाढावी यासाठी जे काही करता येईल तेवढं सगळ चालू होतं. कुठेही कशाची कमी ठेवली जात नव्हती.

‘इंडिया शायनिंग’ चा एक भाग म्हणून हैदराबाद पोलिसांनी साफसफाईची मोहीम हातात घेतली होती. पण हि साफसफाई माणसांची होती. जी लोकं रस्त्यावर राहतात ज्यांना आपण भिकारी असं संबोधतो अश्या सगळ्या माणसांना हैदराबाद पोलिसांनी उचलून ३ दिवस परिषद संपेपर्यंत तुरुंगात ठेवलं होतं. ह्या सगळ्यांमध्ये तेजराव देखील होते. पोलिसांनी त्यांना भिकारी समजून रस्त्यावरून उचलून बाकीच्यांबरोबर ठेवलं होतं. परिषद झाल्यावर सोडून दिलं. हे सगळं का तर ‘इंडिया’ ची इमेज जगासमोर छान राहायला हवी मग ‘भारताचं’ काय व्हायचं ते होऊदेत. आपल्या देशाची प्रतिमा जगासमोर चांगली राहायलाच हवी ह्यात काही वाद नाही. पण ती जर अश्या पद्धतीने राहणार असेल तर काही अर्थ आहे का ? ह्यात दोष कुणाचा ? परिषदेच्या निमित्ताने खोटी इमेज उभी करण्याच्या नादात आपण काय करत आहोत अन त्याचे कुणावर काय परिणाम होऊ शकतात ह्याचा विचार हैदराबाद पोलिसांनी केला असेल का? तेजरावांनी हे सांगितल्यावर असे अनेक प्रश्न आम्हाला पडले.

असो तीन साडेतीन महिन्यांनंतर तेजराव सापडल्यामुळे त्यांचा मुलगा, अम्मा अतिशय खुश होते. त्यांच्या गावाकडे नातेवाईक त्यांची वाट पाहत होते. आम्ही आपलं घर मधून निघालो.   त्या सगळ्यांना पुणे स्टेशनला सोडलं अन आम्ही आमच्या घराकडे निघालो.

मनात एकप्रकारचं समाधान होतं. ताटातूट झालेलं एक कुटुंब पुन्हा एकत्र आलं होतं. पण दुसरीकडे विचारांचं चक्र सुरु झालं. असे किती तेजराव आपल्या आजूबाजूला फिरत असतील? त्यांना त्यांचे घरचे भेटतील का? आपली व्यवस्था त्याचं अस्तित्व स्वीकारेल की नाकारेल? बरं, दुसरीकडे आपण ह्या देशाचे नागरिक म्हणून आपलं कर्तव्य बजावणार आहोत का? आपली देशभक्ती फक्त भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान आफ्रिदीच्या आईला प्रणाम करण्यापुरतीच मर्यादित आहे का? आपण नागरिक एवढे जागरूक असतो. बिग बझार मध्ये किती सवलत आहे, पुढच्या महिन्यात प्रदर्शित होणारे चित्रपट, MCd , सबवे मध्ये कुठली ऑफर चालू आहे इत्यादी इत्यादी गोष्टींबाबत आपण किती जागरूक असतो..!!!!!!

माझं हे, माझं ते असं करत आपण अजून किती काळ स्वतःमध्ये गुरफटून राहणार आहोत ? आपली १% जागरूकता तरी आपण अश्या ठिकाणी दाखवली तर किती तेजरावांना त्यांची कुटुंब सापडतील…!!! शिक्षणानी माणूस सुशिक्षित होतो असं म्हणतात. त्या पुढची पायरी प्रगल्भतेची असते. प्रगल्भता तर सोडाच, आपण सुशिक्षित होण्याचा प्रयत्न तरी करतो का? १ डिग्री, त्यात मास्टर्स जमलच तर Phd करतो तर खरं, हे केल्याने चांगली नोकरी, व्यवसाय वैगेरे त्यातून आर्थिक स्थैर्य वैगेरे येतंच. पण हे सगळं करताना आपल्यातला माणूस किती प्रगल्भ झाला ह्याचा विचार आपण कधी केलाय का? आपलं शिक्षण आपल्याला “मार्क्स वादी” बनवत अन आपणसुद्धा त्याच्या आहारी जातो. चांगले मार्क्स मिळवून कुठतरी चिकटतो. ह्या सगळ्यात आपल्यातला माणूस कुठतरी हरवतो हे आपल्याला जाणवत कसं नाही? आम्हाला आमचे मुलभूत अधिकार आठवतात, त्याचं थोडं कुठतरी इकडं तिकडं झालं की आम्ही बोंबा मारायला सुरु करतो. पण दुसरीकडे आपल्या कर्तव्यांच काय? कर्तव्य फक्त लष्करात भरती होऊनच बजावायचं असतं का? लष्कर त्यांचं कर्तव्य सीमेवर व्यवस्थित बजावत आहेत. आपलं काय?

आपल्याला देशाचा नागरिक म्हणून कर्तव्य बजावायचं असेल तर प्रत्येकानेच लष्करात भरती व्हायची आवश्यकता नाही. एक सुज्ञ नागरिक म्हणून आपल्या असलेल्या जबाबदाऱ्या, कर्तव्यांची पुर्तता कायदे, नियम याचं पालन ह्या सगळ्या गोष्टी करून ह्या देशाचा नागरिक म्हणून कर्तव्य बजावता येऊ शकतं. प्रत्येकाने चळवळ उभी करायला हवी असं नाही. पण सगळ्याच धर्मांमध्ये, किमान प्रयत्न तरी करा हाच उपदेश दिला आहे. तसेच राज्यघटनेमध्ये , नागरिकांनी व सरकारने मिळून कर्तव्य पूर्ण करायची आहेत असेच सांगितले आहे. आपण आपल्याला जमेल तेवढं तरी नक्कीच करू शकतो. ह्यातूनच आपल्या देशाची वाटचाल ठरणार आहे. सरकार, प्रशासनाबरोबर आपण नागरिक म्हणून भूमिका कशी पार पडतो यावरच आपल्या देशाचा अन आपला एक नागरिक, व्यक्तीचा विकास अवलंबून आहे. म्हणजे जे घडला त्याचा दोष नागरिकांचा आहे का? असं नाही.

माझ्याही मनात आलंच की काय गलथान कारभार आहे हा!! पण जरा विचार केलं आणि वाटलं, सरकार प्रशासन कोण आहे? वस्तू आहे का? रोबोट आहे का? प्रशासनात असलेले अधिकारी येतात कुठून? निवडून आलेले नेते असतात तरी कोण? एक सामान्य नागरिक प्रशासकीय परीक्षेत उत्तीर्ण होऊन त्या पदावर जातो. त्याधीची सगळी वर्ष तो सामान्य नागरिक असतो. त्यामुळे जसे नागरिक असतात तसेच अधिकारी घडतात आणि तसेच देशाचे प्रशासन चालते. नगरसेवक पदावर निवडून यायच्या आधी नेता एक सामान्य नागरिकच असतो. त्यामुळे नागरिक देशप्रश्नाबद्दल किती सजग आहेत ह्यावरूनच नेत्याची भूमिका ठरणार असते. एखाद्या नेता-अधिकार्यामध्ये २, ३ वर्षात असा काय अचानक आमुलाग्र बदल होणार आहे? मुळात तो बदलणार तरी आहे का? तो जसा नागरिक म्हणून जगलाय तसाच पुढेही जगत राहणार तेही अधिकारपदावर आणि डोक्यात खुर्चीचा माज घेऊन.

असो, शेवटी हे प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून आहे की प्रत्येक वेळी कारणे द्यायची का नागरिक, माणूस म्हणून आपल्या परीने काहीतरी करायचा प्रयत्न करायचा.. !!

“The goal of mankind is knowledge. That is the one ideal placed before us by Eastern philosophy. Pleasure is not the goal of man, but knowledge. Peasure & happiness come to an end. It is a mistake to suppose that pleasure is the goal.”

Swami Vivekananda, Karmayog-The Yoga of action.

हैदराबाद स्टेशनवर तेजरावांचे कुटुंबियांकडून स्वागत.

To read part 1 of this story Click here.

Student of Law, Political Science & Environment.