
WE THE PEOPLE OF _____ ??? ARE WE ??
Part 1.
ह्याघटनेला एक वर्ष होऊन गेलं आहे. ह्या घटनेतून आम्हाला खूप काही शिकायला मिळालं आहे. तेच ह्या लेखनातून मांडण्याचा एक छोटा प्रयत्न. आपण आजूबाजूला बऱ्याचदा ऐकतो की माणुसकी शिल्लक राहिली नाही, काळ बदललाय वैगरे. पण ह्या घटनेतून आम्हाला बर्याच गोष्टींचा प्रत्यय आला. जर त्या दिवशी, मी तिथे थांबलो नसतो तर मला हा अनुभव आला नसता. माझ्यासमोर प्रश्न एवढाच होता की हे काम करायचं आहे की नाही?
हा एक प्रश्न सोडवताना अनेक प्रश्नांची उकल झाली अन माणसावरचा विश्वास आणखी दृढ झाला. आपल्याला आजूबाजूला माणूस शोधण्याची आवश्यकता नाही. आपल्याला आपल्यातलाच माणूस शोधण्याची वेळ आता आली आहे ही जाणीव आम्हाला ह्या घटनेने करून दिली. (ह्या घटनेतील पात्र, प्रसंग, काल्पनिक नसून दुर्दैवाने खरे आहेत. बाकीची मते वैयक्तिक आहेत.)
आजचा दिवस नेहमीप्रमाणे सुरु झाला. आवरून टेकडीवर गेलो. टेकडीवरची झाडे आमची अन आम्ही त्यांची वाट बघतच असतो. आमचं झाडांना पाणी देऊन झालं. अनय त्याच्या कॉलेजच्या तासांना गेला. अन मी इकडे बापट सरांच्या इतिहासाच्या सत्रासाठी निघालो. वाटेत घरून जेवणाचा डबा घेतला. जाताना थोडा कच्चा रस्ता लागतो. तिथे एक माणूस आडवा पडलेला दिसला.. तसं आपल्या परिसरात बऱ्याचदा अशी माणसे आपल्याला रस्त्यावर पडलेली (दारू पिऊन) दिसतातच. अश्यांकडे मी सुद्धा लक्ष देत नाही. पण इथं हा माणूस एवढा धुळीत का झोपलाय ते मला कळेना. म्हणून सायकल ठेवली बाजूला अन त्यांच्या जवळ गेलो. वय अंदाजे ५५-६० वाटत होतं. त्यांच्या अंगातल्या कपड्यांवरून ते बांधकाम मजूर म्हणून काम करत असावेत असा अंदाज बांधला. फाटलेले कपडे (जवळपास अर्धनग्न),अंगाला लागलेली धूळ,माती त्यामुळे झालेल्या जखमा, त्या जखमांवर माश्या बसत होत्या, त्यांच्या अंगाला येणाऱ्या वेगवेगळ्या वासांवरून कित्येक महिन्यात त्यांच्या शरीराचा पाण्याशी संबंध आला नसणार हे जाणवत होतं.
त्यांच्याशी बोलल्यावर हे तरी कळलं की हा माणूस दारू पिऊन इथे पडलेला नाही. मला वाटलं पहिले ह्यांना बाजूला बसवू. पण त्यांना उठून चालण देखील शक्य नव्हतं. म्हणून तिथेच बसवलं. पहिले पाणी दिलं. मग त्यांना थोडं बरं वाटलं. त्यांच्याशी बोलायला लागलो. पण त्यांची भाषा मला काहीच कळेना. मग त्यांना हिंदीत विचारलं की तुम्हाला कुठली भाषा येते मराठी, हिंदी ?? ते म्हणाले ‘तेलुगु’..! झाला ना गोंधळ. दुसरीकडे, येणारे जाणारे माझ्याकडे अन त्या माणसाकडे बघून जातंच होते. मी पोलिसांना (१००) वर फोन करून कळवलं. ५ मिनिटात वारजे पोलीस चौकीतल्या बीट मार्शल चा मला फोन आला. त्यांनी तो माणूस केवढा आहे, कुठे आहे वैगेरे माहिती घेतली, अन म्हणाले, “हा ठीके आम्ही मारतो चक्कर !!” मी म्हणालो, “चक्कर मारतो म्हणजे काय ? अन मी काय करायच आहे तोपर्यंत”. माझ्या ह्या बोलण्यावरून त्यांना अंदाज आला कि हा काय कुठे जाणार नाहीये, मग ते म्हणाले कि थांबा आलो आम्ही. १० मिनिटांनी दोन पोलीस आले.
तोपर्यंत आणखी एक माणूस माझ्याबरोबर थांबला होता. त्याने आणलेलं बिस्कीट त्या माणसाला खायला दिलं. तोपर्यंत पोलिसांनी जवळच जिथे बांधकाम चालू होतं तिथल्या एका माणसाला उचलून आणलं. त्याला तेलुगु येत होती. अन त्याचं मराठी सुद्धा तितकच चांगलं होतं. तो आल्यावर मग त्या माणसाशी बोलायला लागला.
मग हळू हळू थोडी माहिती आम्हाला कळायला लागली. त्या माणसाच नाव के. तेजराव आहे हे कळलं. हैदराबाद मध्ये त्यांचा मुलगा काम करतो असं त्यांनी आम्हाला सांगितलं. आता इतक्या माहितीवरून काय शोधणार. त्या माणसाला म्हणलं कि तेजराव यांना आणखी विचारा. त्यांना अजून काही आठवतय का ते विचारा. तेजराव काहीतरी ‘हुपली, हुपली’ असं त्याचं गाव आहे असं म्हणत होते. मी लगेच गुगल MAP वर शोधलं पण काही संदर्भ लागेना. हुबळी म्हणलं तर कर्नाटक मध्ये येतं, अन तिकडची भाषा कन्नड, पण हे बोलतायत तेलुगु मध्ये, मग तो पर्याय रद्द झाला.
आणखी विचारल्यावर ते काहीतरी ‘पडासा’ अन ‘काशिबुग्गा’ म्हणायला लागले. मग मला तेलंगणामधील ‘वरंगळ’ जवळील ‘काशिबुग्गा’ नावाच ठिकाण सापडलं. पण तरी हे ‘पडासा’ अन ‘हुपली’ काही सापडेना. मग मी नेट वर आणखी शोध घेतला. मग मला कळलं कि ‘कासिबुग्गा’ नावाचं ठिकाण सुद्धा आहे जे आंध्रप्रदेश मध्ये आहे. मग मी गुगल map वर बघायला लागलो. ‘कासिबुग्गा’ सापडलं..!! मग जरा आजूबाजूला बघत होतो तर तिथे एक ‘पलासा’ नावाचं ठिकाण दिसलं. मग म्हटलं की ते ‘पडासा’ बहुतेक ‘पलासा’ असावं. मग आता ‘हुपली’ नावाचं काही दिसतंय का बघायला लागलो. तर ‘पलासा’ जवळच ‘गोपिली’ नावाचं गाव दिसलं. मग अंदाज लावला कि हे ‘हुपली’ बहुतेक ‘गोपिली’ असेल. तसं मी त्या माणसाला तेजराव यांना विचारयला सांगितलं तर ते हो म्हणत होते. पण गोपिली अन हैदराबाद मधलं अंतर बरंच होतं. काहीच निष्कर्ष काढता येत नव्हता. तोपर्यंत पोलिसांनी Just डायल वरून पलासा पोलिसांचा संपर्क मिळवला. एकतर तिकडची लोकं तेलुगु अन इंग्लिश सोडून दुसरी भाषा बोलत नाहीत हे आजवर फक्त ऐकलं होतं, आज त्याचा अनुभव आला.
कसबसं तिथला एक पोलीस हिंदी मध्ये बोलायला लागला मग इकडच्या पोलिसांनी आम्हाला जेवढी माहिती मिळाली होती तेवढी त्यांना सांगितली. इतका वेळ हे नाट्य त्या कच्च्या रस्त्यावरच चालू होतं. हि हद्द कोथरूड पोलिसांच्या कार्यक्षेत्रात येत असल्याने आता तेजराव यांना तिकडं न्यावं लागणार होतं. रिक्षात त्यांना बसवलं अन मी सुद्धा सोबत बसलो.
चौकीत गेलो तर सगळेजण मी कुणाला उचलून आणलंय अश्याच नजरेने बघत होते. तेजरावांना तिथल्या बाकावर बसवलं अन तोपर्यंत ह्यांच्या साहेबांचं आगमन झालं. त्यांनी मला विचारलं की काय आहे, कशाला आणलंय ह्याला इथे. मी त्यांना जेवढी माहिती माझ्याकडे होती तेवढी दिली. मग ते म्हणले पुढे काय ? आम्ही कसं ठेवून घेऊ त्यांना इकडे, आम्हाला बरीच कामे आहेत, कोर्टात जायचं आहे, वैगेरे अशी कारणे सांगणं सुरु केलं. मी म्हटलं कि त्यांनी जेवढी माहिती दिली आहे त्यावरून आपण तिकडच्या पोलिसांना संपर्क करू शकतो अन बघू शकतो काय होतंय ते. अन तसंही आम्हाला पलासा पोलिसांकडून २ नंबर मिळाले होते. हे साहेब मलाच म्हणले बघा तुम्हीच फोन करून काय होतंय का ते.
मी वाद नं घालता फोन केला तर तिकडचा पोलीस काही केल्या हिंदी मध्ये बोलेनात. मी त्यांना म्हटलं कि मला तेलुगु येत नाही तरी सुद्धा तो काही ऐकेना. शेवटी म्हणाला इंग्लिश! मग थोडक्यात त्याला मी सांगितलं मग त्याने आणखीन एक नंबर दिला. मी तो नंबर फिरवला तर उचलून कट करणे असले प्रकार सुरु झाले. शेवटी मी आत गेलो अन म्हणलो कि तुम्ही करा फोन किमान तुम्हाला जरा तरी प्रतिसाद(किंमत) मिळेल. आम्हाला कोण विचारतंय. शेवटी हे ‘साहेब’ झाले एकदाचे राजी. त्यांनी फोन लावला राजेश म्हणून कोणतरी अधिकारी होता. त्याने Whatsapp वर तेजरावांचा फोटो मागवला अन बाकी माहिती घेऊन कळवतो म्हणाले. साहेबांनी फोटो काढून पाठवला. त्या राजेश नावाच्या तिकडच्या पोलीस अधिकाऱ्याचा Whatsapp चा डीपी बघून इकडे ह्यांची “आंध्र च्या पोलिसांना पगार कसे जास्त आहेत!” ह्यावर चर्चा सुरु झाली. माझा इतका संताप होत होता. पण शेवटी अडला हरी …….. !!!! आतला आवाज सांगत होता की आता जे होईल त्याला समोर जाऊन काम पूर्णत्वास न्यायचं!

तिकडून आम्हाला केव्हा माहिती मिळणार ह्याची काहीच कल्पना नव्हती. तोपर्यंत तेजराव यांची व्यवस्था करणे आवश्यक होते. रस्त्यावर इकडे तिकडे राहिल्यामुळे, खायला नं मिळाल्यामुळे ते अशक्त झाले होते. मी त्या साहेबांना म्हटलं कि आता ह्यांचं काय करायचं. तर हे साहेब मलाच सांगायला लागले कि हे लोक कसे असतात, ह्यांना सोडलं तरी पुन्हा इकडेच येतात, इतक्या वर्षात हा माणूस का नाही गेला घरी! मी म्हटलं मान्य आहे ह्यातलं काही नाकारता येणार नाही पण आपण खात्रीने असचं असेल असं नाही म्हणू शकत. मग मला ते म्हणले तुम्हीच बघा काय सोय होते का ह्यांची. एखादी संस्था वैगेरे बघा, इतका मोलाचा सल्ला मला ते देत होते. माझी जवळपास खात्री पटली होती की हे काही करणार नाहीत जे काही करायचय ते आता आपल्यालाच करावं लागणार आहे.
एकीकडे मी अनयला मेसेज करून कळवलं कि हे असं असं झालं आहे कॉलेज सुटलं की ये इकडे. आता दुसरीकडे ह्यांना कुठे ठेवता येईल ह्यासाठी मी काही ओळखीच्या लोकांना फोन सुरु केले. मी आमच्या सौरव सरांना फोन करून सगळं सांगितलं, ते म्हटले एक संस्था आहे जी ह्यांना तिथे ठेवू शकेल पण त्याआधी त्यांना त्या संस्थेच्या संचालकांशी बोलायला लागेल. थोड्याच वेळात मला सौरव सरांचा फोन आला त्यांनी सांगितलं कि त्या संस्थेचे संचालक कामात असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नव्हता. दुपारी १२ नंतर त्यांच्याशी संपर्क होणार होता. आता वाट पाहण्यापलीकडे काहीच करण्यासारखं नव्हतं. तेजराव याचं नशीब थोर म्हणून पोलिसांनी त्यांना किमान नाश्ता तरी आणून दिला. तोपर्यंत अजून कुठल्या संस्थेत काही सोय होत आहे का म्हणून मी प्रयत्न करतच होतो. पण काही होईना. एव्हाना १२ वाजले होते. अनय त्याचं कॉलेज संपवून आला. थोड्याच वेळात आम्हाला सौरव सरांकडून देखील कळलं कि ती संस्था त्यांना ठेवून घ्यायला तयार आहे. हुश्श झालं. किमान एक काम तरी झालं होतं.
पण त्याहून आणखी महत्वाच काम राहिलं होतं. आंध्र पोलिसांकडून काहीच कळालं नव्हतं. थोड्या वेळाने हे साहेब बाहेर आले, त्यांना त्या राजेश (आंध्र पोलीस) ह्यांचा फोन आला. त्या राजेश सरांनी त्यांच्या गावात जाऊन त्यांचं घर शोधलं अन त्यांच्या घरच्यांची माहिती सुद्धा घेतली. गोपिली गावातल्या काही माणसांनी फोटो बघून तेजराव यांची ओळख पटवली. आम्ही तेजरावांना फोन दिला पलीकडून त्यांचा गाववाला जेव्हा त्यांच्याशी बोलला तेव्हा त्यांचा आवाजच लगेच बदलला. डोळ्यात पाणी आलं. इतका वेळ जे साहेब मला हि लोकं कशी असतात ह्याचं तत्वज्ञान ऐकवत होते, हे पाहिल्यावर त्यांच्यातला माणूसदेखील थोडासा कुठेतरी हलला. तेजरावांचा आवाज अन डोळ्यात आलेलं पाणी हे बघून आम्हाला हे कळलं कि नंबर बरोबर लागलाय. अजून त्यांच्या घरच्यांशी बोलणं व्हायचं होतं. थोडी धाकधूक होतीच. कारण नक्की काय घडलं आहे हे अजूनही आम्हाला कळल नव्हतं. आता तेजरावांना त्या संस्थेत नेणं बाकी होतं त्यासाठी पोलीसांच्या पत्राची आवश्यकता होतीं. साहेबांनी वेळात वेळ काढून पत्र अन त्यांची मोलाची स्वाक्षरी दिली. आम्ही म्हणलो किमान त्यांना तिथपर्यंत नेण्याची व्यवस्था तरी करा. तर पुन्हा ह्यांचे नन्नाचे पाढे झाले सुरु. मला पहिलं तेजरावांना त्या संस्थेत पोचवायच होतं त्यामुळे मला त्यांच्याशी वाद घालायची आजिबात इच्छा नव्हती.
क्षणाक्षणाला संताप तर एवढा होत होता ना…पण असो..व्यवस्था एक ! त्याची २ रूपे आम्हाला बघायला मिळाली, एक इथले पोलीस जे जितकी जबाबदारी टाळता येईल तेवढं बघत होते अन मेलियापुट्टी (आं.प्र) येथील पोलीस अधिकारी राजेश ज्यांनी केवळ ३ तासात तपास करून तेजराव याचं घर शोधून काढलं. ह्यावरून जर व्यवस्थेबद्दलचा निष्कर्ष काढायचा असेल तर आपण सगळं चांगलं आहे अन सगळंच अगदी वाईट आहे असं म्हणणं चुकीचं ठरेल. आपल्याला दिलेलं काम जर आपण नीट, प्रामाणिकपणे केलं तर काय होऊ शकत जे राजेश सरांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिलं. अन जर नाही केलं तर तर काय होऊ शकतं हे इथल्या पोलिसांनी दाखवून दिलं. शेवटी व्यवस्थेच यश, अपयश हे त्या व्यवस्थेतल्या व्यक्तींवर अवलंबून आहे. अन कुठेतरी ‘राष्ट्रीय चारित्र्य’ हा घटकसुद्धा महत्वाचा ठरतो असं मला वाटतं.
एकीकडे अनय गाडी घेऊन आला. आम्ही तेजरावांना गाडीत बसवलं अन निघालो डोणजेकडे जायला. जात असतानाच मला एक फोन आला. तेजरावांच्या मुलाचा हैदराबाद मधून फोन आलेला. त्याच्याशी मी बोलून तात्पुरती माहिती घेतली. त्याला आम्ही त्याच्या वडिलांना कुठे घेऊन चाललो आहोत याची माहिती दिली. त्याचं व त्याच्या वडिलांचं फोनवर बोलणं झालं. आम्हाला तेलुगु येत नसलं तरी तेजरावांचा आवाज अन डोळ्यातलं पाणी खूप काही बोलून जात होतं. एव्हाना आम्ही डोणज्यात पोचलो होतो.
To read Part 2 of this story Click here.

One Comment
Pingback: