Village in Palghar District
Opinion

धर्म ?? धर्म म्हणजे काय?

To read this article in English – click here

लेखाचं शीर्षक वाचून कदाचित असं वाटेल की मी धर्माबद्दल काहीतरी तात्विक बोलणार आहे.पण तसं काही ह्या लेखात नसणारे. लेखाचं शीर्षक हे मी काहीजणांना विचारलेल्या प्रश्नाला मला मिळालेलं उत्तर आहे. गेल्या वर्षी मी गूंज संस्थेच्या सर्वेक्षणासाठी पालघर जिल्ह्यात होतो. पालघर म्हटलं कि आपल्याला आदिवासी अन कुपोषण ह्या दोनंच गोष्टी डोळ्यासमोर येतात. सर्वेक्षणदरम्यान आम्हाला संस्थेच्या उपक्रमात सहभागी झालेल्या लोकांकडून काही माहिती घ्यायची होती. त्यात नाव, गाव, वयाबरोबर जात अन धर्माचा प्रश्नंदेखील होता.

मी जेव्हा तुमचा धर्मं कोणता? असं विचारलं तेव्हा बहुतेकांकडून आलेली पहिली प्रतिक्रिया म्हणजे धर्म? धर्म म्हणजे काय? हा विचारला गेलेला प्रश्नं.!! खरंतर हा प्रश्नं म्हणजे मला व समाज म्हणून आपल्या सर्वांना दिलेल्या एका सणसणीत थोबाडीसारखा भासला. खरंतर केवळ सर्वेक्षणाचा भाग म्हणून मी हा प्रश्नं विचारत होतो. अन संस्थादेखील जाती-धर्मावर आधारित भेदभाव करत नाही. पण मला अश्याप्रकारचं उत्तर ऐकायला मिळेल ह्याची कल्पना मी कधीच केली नव्हती.

त्याचं कारण म्हणजे आपण सर्वांनीं आपली एकमेकांमध्ये केलेली विभागणी ! आपल्याकडे ज्या गोष्टींना महत्त्वं द्यायला हवं ते सोडून जात, धर्म हे विषय आपल्याला जास्तं जिव्हाळ्याचे आहेत. कारण त्यावर कोटा, शुल्क, मतपेढी, पर्यायाने सरकार, मंत्रिपदं, बढत्या इत्यादी अवलंबून असतं. त्यामुळे ह्या जाती धर्माच्या भिंती अंबुजा सिमेंटपेक्षा अधिक मजबूत भासतात.

आपण कितीही धर्मनिरपेक्षतेच्या गप्पा मारत असलो तरी आपण आतून किती धर्मनिरपेक्ष आहोत हे आपल्या प्रत्येकाला चांगलंच ठाऊक आहे. अगदी छोटं उदाहरण द्यायचं झालंच तर आपल्याला जेव्हा एखादी नवीन, अनोळखी व्यक्ती भेटते; तेव्हा आपण तिला नाव, गाव विचारतो. ती व्यक्ती तिचं अ.ब.क नाव सांगते. नाव ऐकून आपलं समाधान नाही झालं तर आपला मोर्चा आडनावाकडे वळतो. खरंतर नावापेक्षा आडनाव जाणून घेणं हा नाव विचारण्यामागचा हेतू असतो. त्यामुळे आपल्याला त्या व्यक्तीविषयी प्राथमिक मत बनवता येतं. त्या आडनावावर ती व्यक्ती ‘आपली आहे कि नाही हे ठरतं. नाव विचारण्यामागचा खरा हेतू कुठला ? तुमचा काय हेतू असतो. आपलं इथंच भागलं तर कसं ना म्हणजे. आपली गाडी ओपन, SC ST, SBC, OBC पर्यंत जाते. तिचं पुढचं स्टेशन घाटावरचे कि खालचे, ९२ कि ९६ कुळी ते भटके विमुक्त असते.

ह्यात आपण व्यक्तीला एक माणूस म्हणून समजून घ्यायचा कितपत प्रयत्नं करतो? ह्याचं उत्तर आपण प्रत्येकानी स्वतःला प्रामाणिकपणे द्यायचं आहे. आपली प्रत्येक समाज, जाती धर्माबद्दल काही गृहीतक ठरलेली आहेत अन तीच आपल्याला सत्यं आहेत असं आपलं ठाम मत असतं. आता हा लेख वाचून झाल्यावर माझं आडनाव बघून काही जण हा ‘आपला’ आहे कि नाही हे ठरवून मोकळे पण होतील.

जाती धर्माचा प्रश्नं काय नवीन नाही. कित्येक वर्षांपासून तो अस्तित्वात आहे. प्रत्येकाच्या रूढी, परंपरा, दैवतं वेगवेगळी आहेत. पूर्वीच्या काळी धर्माचा अर्थ जीवन जगण्याची आखून दिलेली एक पद्धत एवढ्यापुरतंच मर्यादित होता. पण त्याचं पुढे तुमची पद्धत श्रेष्ठ कि आमची ह्यातून सुरु झालेल्या वादाची मजल भेदभाव, द्वेष, हिंसा, संहारापर्यंत जाऊन पोचली.

दोन व्यक्ती कधीही एकसारख्या नसतात. दोघांमध्ये काही साम्यं, वेगळेपण असतंच. केवळ तेवढ्यावरच एखादी व्यक्ती सरस, उच्च वा दुय्यम ठरत नाहीं. तसेच ज्या माणसांनी हे धर्म बनवले आहेत ते तरी कसे सारखे असतील? कशाला कुठला धर्म श्रेष्ठ असेल?

माणूस श्रेष्ठ कि धर्म? कुठला धर्म हिंसा शिकवतो? कुठलाही धर्म एखाद्या व्यक्तीने तीच आयुष्यं कसं जगायचं ह्याचा मार्ग दाखवतो. आपलं आयुष्य अर्थपूर्ण करतो. धर्मं म्हणजे एक दिशा. पण आपण मात्र आपलंच धर्मं काय तो श्रेष्ठं!! ह्या समजुतीतून दुसऱ्या धर्माच्या व्यक्तीला आपल्यात सामील करून घ्याचा अट्टाहास करतो. त्याच अट्टाहासाची परिणीती हिंसा, अत्याचार, खून, धर्माच्या नावाखाली केलेले बलात्कार आणि कट्टरतावादामध्ये होते. आपण आपली दिशा शोधायच्या ऐवजी आपली हि अशी दशा करून घेतो.

अचानक मग माणुसकी, मानवता ह्या धर्मांना जग येते. त्याच्या दवंड्या पिटवल्या जातात. कारण ह्या धर्माला मागच्या काही वर्षातल्या हिंसाचाराची किनार असते. मग काही वर्ष शांततेत जातात मग पुन्हा हिंसा आपल्या दाराशी असतेच. हे पाहिल्यावर प्रश्न पडतो नेमका धर्मं म्हणजे आहे तरी काय? अन मानवता ह्या धर्माची वाट हिंसेतून जायलाच हवी का? समाजात जरी शांतता प्रस्थापित झाली तरी आपल्या मनातल्या हिंसेचं काय?

Village in Palghar District

पालघरचे आदिवासी मला हा प्रश्न विचारतात कारण त्यांना अजून आपल्या जाती-धर्माचे वारे कदाचित तितके लागले नाहीयेत. आनंदानी जगणं हा त्यांचा धर्मं. दारी आलेल्या माणसाला घरच्या सदस्यासारखं वागवणं हि त्यांची संस्कृती! तिथे कुठल्या जाती धर्माच्या भिंती वा पडदे आड येत नाहीत. अर्थात त्यांचा समाज देखील दोषमुक्त नाही परंतु तो ह्या लेखाचा मुख्य विषय नाही. आदिवासींना आनंदाने जगणं माहित आहे म्हणून त्यांच्या मनात ‘हिंसा’ धर्मं नाही. ज्याच्या मनात हिंसा नाही तिथे वेगळेपणाला स्वीकारण्याची, त्याच्याप्रती आदरभाव ठेवण्याची वृत्ती आहे. तिथे खऱ्या अर्थाने ‘माणूस धर्म’ प्रत्यक्ष नांदताना दिसतो. धर्म म्हणजे काय ह्या प्रश्नाचं उत्तर मला आदिवासींकडून मात्र मिळालं.

काय मग तुमचा धर्म कोणता ?

तुम्हाला हा लेख कसा वाटला ते खाली कमेंट्स मध्ये नक्की मांडा. तसेच हा लेख तुमच्या मित्र-मैत्रीण अन नातेवाईकांना नक्की शेयर करा..!!

Student of Law, Political Science & Environment.

5 Comments