आझादी …..
खरंतर ह्या लेखातला जवळपास ७०-८० टक्के भाग मी २ वर्षांपूर्वीच लिहून काढला होता. तेव्हा आझादी, स्वातंत्र्य, अधिकार अन जबाबदारी ह्या शब्दांचा जो अर्थ जाणवत होता त्यानुसार जे सुचलं ते लिहून काढलं. पण काहीतरी राहून जातंय म्हणून तसाच ठेवला होता. ह्या स्वातंत्र्यदिनी पुन्हा एकदा हा लेख उघडून वाचला तेव्हा ह्यातल्या अनेक गोष्टी अजूनही तशाच आहेत असं जाणवलं. आत्ता फक्त अपूर्ण लेख पूर्ण करण्यासाठी थोडं लिहून ब्लॉगवर टाकत आहे.
भारताला स्वातंत्र्य मिळवून ७३ वर्षे झाली. 1947 साली ब्रिटिश देश सोडून गेले. त्यावेळच्या राज्यकर्त्यांसमोर अनेक समस्यांचा पर्वत उभा होता. गरिबी, रोगराई, जातीयता, रोजगार, उद्योग, कृषी अशा अनेक समस्या होत्याच. त्या वेळच्या राज्यकर्त्यांनी त्या त्या वेळेस योग्य ठरतील असे निर्णय घेत त्यावेळच्या समस्यांवर मात करण्यास सुरुवात केली. त्यात समाजवादी मॉडेल, महलोनोबिस मॉडेल, कुळकायदा अन जमिनी मालकीच्या इतर सुधारणा, बँकांचे राष्ट्रीयीकरण, चीन आणि पाकिस्तान बरोबरची युद्धे, पोखरण येथील अणुचाचण्या, 1991 च्या आर्थिक सुधारणा- उदारीकरण, खासगीकरण, जागतिकीकरण, जीएसटी व अशा इतर अनेक उपायांनी विविध समस्यांवर करण्यात आली.
परिणाम गरिबी कमी झाली, जन्मदर-मृत्युदर सुधारणा, हरित क्रांती, शिक्षणाचा टक्का वाढला, समाजातील अनेक स्तरापर्यंत शिक्षण, आरोग्य व इतर सोयी पोचल्या, जो समाज स्वातंत्र्याआधी मागास होता त्या समाजाने शिक्षण, सरकारी नोकरी, राजकारण आशा अनेक गोष्टींमध्ये प्रगती केली, पाकिस्तानबरोबरची सर्व युद्धे जिंकली, क्रीडा क्षेत्रात तिरंगा दिसायला लागलाय असे अनेक निकाल आपल्याला दिसत आहेत. म्हणून सर्व समस्या सुटल्या आहेत का ?? तर अर्थातच नाही ….
आज आपण सार्वभौम देश आहोत. अर्थात आपण सामान्य नागरिक ह्या देशाचे राज्यकर्ते आहोत. आपल्याला परकीय शक्तींपासून आझादी मिळून ७३ वर्ष झाली आहेत. परंतु आजही अनेक जण वेगवेगळे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लढा देत आहे. कुणी न्यायालयात, कुणी सरकार- प्रशासनाशी तर कुणी धर्मातल्या रूढी- परंपरेशी लढा देत आहे.
कुणाला खासगीपणाचं स्वातंत्र्य हवंय तर कुणाला मंदिरात प्रवेश करण्याचं, देशातल्या स्त्रियांना- बहिणींना, छोट्या मुलांना त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारांपासून स्वातंत्र्य हवं आहे तर कुणाला सरकारी कामासाठी द्याव्या लागणाऱ्या लाचेपासून, कुणाला ट्रिपल तलाक, बुरख्यापासून तर स्त्रियांना मासिक पाळी ‘अनैसर्गिक, म्हणून नाकारण्यात येणाऱ्या प्रवेशापासून. शेतकरी बांधवाला सावकाराच्या अत्याचारांपासून तर ग्रामीण भागातील महिलांना चुलीच्या धुरापासून, कॉलेजला जाणाऱ्या मुलींना गर्दीतल्या नकोशा स्पर्श तसेच नजरेपासून तर तरुणाईला लिव्ह इन साठीच स्वातंत्र्य हवंय.
समाजाला जातीय द्वेष, असमानतेपासून तर तुरुंगात कुठलाही गुन्हा केलेला नसताना खितपत पडलेल्या आरोपींना तुरुंगातून सुटकेसाठी स्वातंत्र्य हवंय. सर्वसामान्य नागरिकांना इस्पितळात येणाऱ्या भरमसाठ बिलापासून, काहींना तर चौकात आडवा येणाऱ्या वाहतूक पोलिसपासून पण स्वातंत्र्य हवंय. प्रशासनाला राजकीय दबावापासून तर नागरिकांना सरकार-प्रशासनाच्या अकार्यक्षमतेपासून स्वातंत्र्य हवंय. ईशान्य भारतातल्या बांधवांना अफस्पा (Armed Forces { special powers} Act) पासून तसेच रूढी परंपरा यामध्ये होणाऱ्या अतिक्रमणापासून, तसेच बांग्लादेशातून होणाऱ्या घुसखोरीपासून स्वातंत्र्य हवंय.
काश्मीरला सततच्या अशांततेपासून तर पंजाबला ड्रग्सच्या विळख्यापासून. उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र यांना वाढत्या गुन्हेगारीपासून तर पश्चिमबंगाल व दक्षिणेकडच्या राज्यांना हिंदीच्या शिरकावापासून तर दिल्लीला धूरक्यापासून!! महाराष्ट्रात काही घटकांना राजकीय कारणासाठी उत्तरेकडून येणाऱ्या लोंढ्यांपासून तर छत्तीसगढ, झारखंड, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र ह्या राज्यांना माओवादी व नक्षल चळवळीपासून स्वातंत्र्य हवंय. तर काही राज्यांना तर आता विशेष दर्जा व राज्याचा ध्वज असण्याचं स्वातंत्र्य हवंय.
काहींना भारतात राहून “भारत विरोधी” घोषणा देण्याचं स्वातंत्र्य हवंय तर काहींना आंदोलन, मोर्चे यांच्या नावाखाली जाळपोळ, दगडफेक, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्याचं स्वातंत्र्य हवंय. काहींना गुन्हे करून, कायदा सुव्यवस्थेची पुरती वाट लावून राजकीय सरंक्षण मिळण्याचं स्वातंत्र्य हवंय.
काहींना ‘मन की बात’ पासून स्वातंत्र्य हवंय तर काहींना स्वतःची ‘मन की बात’ वाट्टेल त्या पद्धतीने करण्याचे. राजकारणी उर्फ लोकप्रतिनिधींना स्वतःची व्होट बँक जपण्यासाठी समाजाला जाती, धर्माच्या नावाखाली पेटवण्याचं स्वातंत्र्य हवंय. पोलीस दलाला आधुनिकीकरणात होणाऱ्या दिरंगाईत तर सरकारी कर्मचाऱ्यांना आठवड्यात कमी काम करण्याचं तर शिक्षकांना शिक्षणेत्तर कामापासून स्वातंत्र्य हवंय. काही कामगार संघटनांना प्रशासन, सरकार ह्यांना संप करून वेठीस धरण्याचे स्वातंत्र्य हवंय.
देशाला आसाराम बापू, राम रहीम तसेच स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्या ख्रिश्चन मिशनारिंपासून तर देशविरोधी भावना लहान मुलांवर बिंबवणार्या मुल्ला, मौलवींपासून स्वातंत्र्य हवंय. शालेय विद्यार्थ्यांना शाळेच्या जड बॅगेपासून, तर विद्यापीठ, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना 75% उपस्थितीपासून. तसेच शाळा, कॉलेज येथे असणाऱ्या अस्वच्छ ‘स्वच्छतागृहांपासून’ स्वातंत्र्य हवंय. खासगी क्षेत्रात लिंगआधारित असणाऱ्या पगारातल्या असमानतेपासून तर सोशल मीडियाला सततच्या ट्रोलिंग पासून. काही नागरिकांना सोशल मीडियावर फेक न्युज, खोटे मेसेज पसरवण्याचे स्वातंत्र्य हवंय. जंगलांना सततच्या वणव्यापासून तसेच अशास्त्रीय पद्धतीने होणाऱ्या वृक्षालागवडीपासून तर वन्यप्राण्यांना “इको टुरिझमच्या” नावाखाली मानवाच्या जंगलात होणाऱ्या अतिक्रमणापासून स्वातंत्र्य हवंय. ऐतिहासिक वारसास्थळे, गड किल्ले यांना त्यांच्या होणाऱ्या दुर्दशेपासून पासून स्वातंत्र्य हवंय.
छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, टिळक, सावरकर, ज्योतिबा फुले या सर्व महान व्यक्तिमत्वांना त्यांच्या नावाखाली होणाऱ्या गैरप्रकारांपासून स्वातंत्र्य हवंय. काहींना गणेश विसर्जन, अजान तसेच इतर अनेक महान लोकांच्या जयंत्या साजऱ्या करताना होणाऱ्या गोंगाटापासून स्वातंत्र्य हवंय.
एकूणच काय तर प्रत्येकासाठी स्वातंत्र्याचा अर्थ, व्याख्या वेगवेगळी आहे. सध्या कोरोनापासून तर सर्वांनाचाच स्वातंत्र्य हवंय. पण प्रत्येक स्वातंत्र्याबरोबर काही जबाबदारी येत असते त्याचं काय? तसेच स्वातंत्र्य कशासाठी हवंय, त्याचा उद्देश आपल्याला माहित असतो का ?
स्वातंत्र्य, दिशा अन आपण ….
१९४७ ला आपल्या देशाला ब्रिटिशांपासून राजकीय स्वातंत्र्य मिळाले हे तर आपल्या सर्वांनाच माहित आहे. परंतु जे स्वातंत्र्य सैनिक यासाठी झटले, लढले, प्राण दिले त्यांचा उद्देश हा फक्त स्वातंत्र्य हाच होता का? स्वातंत्र्य हे अंतिम ध्येयं नव्हतं तर आपल्या प्रगतीसाठीचा, देश, समाज ह्याच्या प्रगतीसाठीचा एक टप्पा होता.
जर आपण स्वातंत्र्य हाच एकमेव उद्देश ठेवला असता तर आपल्या देशाची अवस्था नंतर काय झाली असती ह्याचा विचार केलाय का? पण तेव्हाच्या नेत्यांकडे स्वातंत्र्य मिळाल्यावर देशाला आकार कसा द्यायचा आहे, कुठल्या गोष्टी अमलात आणायच्या आहेत तर कुठल्या गोष्टींना प्रतिबंध करायचा आहे ह्याचा साधारण विचार होता. त्याचीच परिणीती, फळ म्हणजे आपली आज असलेली राज्यघटना आहे. राज्यघटनेनी आपल्याला स्वातंत्र्यानंतर एक दिशा दिली. जर ती दिशा नसती तर नक्कीच अराजकता माजली असती.
बऱ्याचदा आपण स्वातंत्र्य हे अंतिम ध्येयं मानून बसतो. पण स्वातंत्र्य घेऊन करायचं काय ह्याची काडीमात्र स्पष्टता नसते. विचारहीन अन दिशाहीन स्वातंत्र्य आपल्याला स्वैर अन उन्मत्त बनवते. स्वैराचाराचं उदाहरण द्यायचंच झालं तर आपला शेजारी जिगरी दोस्त पाकिस्तान हे उत्कृष्ट उदाहरण आहेच. स्वातंत्र्यानंतर दिशा नसेल तर काय दशा होते त्याचा उत्तम नमुना म्हणजे पाकिस्तान. स्वातंत्र्याचा पायाच जर कमकुवत, अनैतिक असल्यामुळे काय होऊ शकतं हे त्यांची गेल्या ७० वर्षातली परिस्थिती पाहून दिसून येतं. पण जर भारताकडे पाहिलं तर जगासमोर एक उत्कृष्ट उदाहरण ठरतं.
अनेक धर्म, जाती त्यांच्या पोटजाती, भिन्न संस्कृती, सणवार- खाण्याच्या , कपड्याच्या सवयी वेगवेगळ्या. त्यात आपल्यात भांडणं काही कमी नाहीत. पण एवढं असूनदेखील आपण एक आहोत अन ह्यापुढे पण राहू हा विश्वास आहे. कारण आपल्या स्वातंत्र्याचा पायाच इतका मजबूत आहे तसेच तो आणखीन मजबूत बनवण्याचं काम व त्यावर इमारत बांधण्याचं काम आपल्या देशातील सामान्य नागरिकांनी अतिशय उत्तमरीत्या केलं आहे. आता आपल्या सर्वांची जबाबदारी बनते कि हि इमारत बुर्ज खलिफा पण झक मारेल इतकी उंच बनवायची आहे. परंतु हे सर्व सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नातून तसेच आपली जबाबदारी ओळखून ती निभावली तरंच शक्य आहे.
स्वातंत्र्य आपल्याला व्यक्ती म्हणून अधिक प्रगल्भ होण्याची संधी देतं. ज्या विषमतेमुळे, अन्यायामुळे आपली एक व्यक्ती, कुटुंब, समाज आणि देश म्हणून प्रगती खुंटलेली असते त्यातून बाहेर येऊन स्वतःचा विकास करायची संधी हे स्वातंत्र्य देत असतं.
म्हणजे स्वातंत्र्य हे त्याच्याबरोबर जबाबदारी घेऊन येतं. एकतर स्वातंत्र्य असच कुणी आपल्याला फुकट देत नसतं. एकतर ते लढून संघर्ष करून मिळवावं लागतं. मग हा संघर्ष कदाचित स्वतःशी, प्रशासन अथवा सरकार कुणाशीही असू शकतो. त्यामुळे आपण ही अपेक्षा बाळगणं चुकीचं आहे की आपल्याला स्वातंत्र्य सहज मिळेल. ते मिळवावं लागतं, कष्टं घ्यावे लागतात. जर आयतं स्वातंत्र्य मिळालं तर त्याची किती जणांना किंमत राहते? मग ते स्वातंत्र्य न राहता स्वैराचार बनतं. तर स्वातंत्र्य त्याच्याबरोबर जी जबाबदारी घेऊन येत ती निभावणाच्या योग्यतेचे आपण असतो का? स्वातंत्र्य मिळवताना आपण स्वतःला स्वातंत्र्योत्तर येणारी जबाबदारी निभावण्यासाठी घडवलं नाही तर मिळणारं स्वातंत्र्याचा आनंद चिरकाल टिकत नाही.
आपण जर असं म्हणलं की आम्हाला फक्तं स्वातंत्र्यच हवंय, जबाबदारी नको. तर असं होऊ शकत नाही. कारण स्वातंत्र्य आणि जबाबदारी ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आपण जर जबादारी स्वीकारत नसू तर आपण सतत प्रत्येक गोष्टीसाठी इतरांकडे बोट करून मोकळं होतो. जे की आपण अनेक गोष्टीत घडताना रोज पाहतो. ह्या ना त्या गोष्टीत आपणसुद्धा ह्यात सहभागी असतो.
मिळालेल्या स्वातंत्र्याची जबाबदारी घेतल्याने एकतर आपल्याला त्याची जाणीव राहते. तसेच आपल्याला पुढील वाटचालीची स्पष्टता येते. परिणाम स्वतःचा विकास, वाढ होते. पर्यायाने समाज प्रगल्भ होतो. देशाची प्रगती होते. पण जबाबदारीविना स्वातंत्र्याने फक्त स्वैराचार फैलावतो.
Now Choice is yours…..Azadi with responsibility or without responsibility.
“The active citizenry is a sign of developed society”
– Adv. Anay Pethe
– The Common Citizen