Cycling Diary

सायकलवरचा पर्यावरणदिन !! – 2

भाग २

स्वच्छ भारत पर्यटन स्थळ !!!!!

            आम्ही मुद्दामहूनच वेंगुर्ल्याला आमचा मुक्काम ठेवला होता. कारण सुद्धा तसच होतं. मध्यंतरी आम्ही वेंगुर्ला नगरपरिषदेने राबविलेल्या कचरा प्रकल्पाबाबत ऐकले होते. तिथे एवढे नक्की काय आहे ह्याची उत्सुकता आम्हाला इथे घेऊन आली होती. ह्या आधीच्या संपूर्ण प्रवासात पुढे एखादं गाव जवळ आलंय हे आम्हाला रस्त्यांवरच्या पाट्यांच्या आधी रस्त्याच्या कडेला लागलेल्या कचर्याच्या ढिगांमुळे समजत होतं. पण इथे वेंगुर्ल्यात तसं नव्हतं. संपूर्ण गावात स्वच्छं रस्ते आहेत !! विश्वास बसणार नाही पण खरच आम्ही हे अनुभवलं !! एका दुकानदाराशी आम्ही बोलत होतो, जरा माहिती घेत होतो. तो दुकानदार अभिमानाने सांगत होता की आमचे साहेब कार्यालयात नाही, तर एकतर प्रकल्पावर नाहीतर घंटागाडीबरोबर दिसतील !! हे ऐकून ह्यांचे साहेब आहेत तरी कोण ह्याची उत्सुकता आम्हाला लागली. आम्ही नगरपरिषदेच्या कार्यालयात गेलो. ह्यांचे साहेब कामानिमित्त मुंबई ला गेले होते. पण इथे आम्हाला अतिशय चांगला अनुभव आला ( सरकारी कार्यालय असून सुद्धा).

वेंगुर्ल्याचे स्वच्छ रस्ते.

           आम्हाला कचरा प्रकल्प दाखवण्यात आला. हा कचरा प्रकल्प ज्या जागेवर आहे ती जागा आधी डम्पिंग ग्राउंड होती. पण आज इथे जर आपण गेलो, तर आधी इथे डम्पिंग ग्राउंड होतं ह्यावर आपला विश्वास बसणं अवघड गेलं असतं. डम्पिंग ग्राउंड च रुपांतर पर्यटन स्थळात झालं होतं. प्रकल्पाचे कामकाज पाहणारे पवार साहेब ह्यांनी आम्हाला संपूर्ण प्रकल्पाची माहिती दिली. इथे कचऱ्याचं २३ प्रकारात वर्गीकरण केलं जातं. इथे ओल्या कचऱ्याचं रुपांतर Biogas मध्ये केलं जातं. त्यापासून वीजनिर्मिर्ती करून प्रकल्पावरचे सर्व संच ह्या विजेवर चालवले जातात. पालापाचोळा, झाडांच्या फांद्या ह्यांपासून कांडीकोळसा बनवला जातो. ह्याचा वापर जळणासाठी केला जातो. आपल्याकडे प्लास्टिक ची समस्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे. पण ह्या समस्येचं उत्तर आम्हाला इथं मिळालं. इथे प्लास्टिक यंत्रातून काढलं जातं. प्लास्टिक चा पूर्ण चुरा केला जातो. हे प्लास्टिक डांबरामध्ये मिक्स करून संपूर्ण वेंगुर्ला मध्ये प्लास्टिक-डांबर मिश्रित रस्ते बनवले आहेत. ह्या रस्त्याचं आयुष्य सुद्धा साधारण रस्त्यांपेक्षा जास्त असतं. बायोगास मधून उरलेल्या घटकापासून खत बनवलं जातं. इथे कचरा हा टाकाऊ पदार्थ नसून उत्पन्नाचं साधन आहे. आजूबाजूच्या गावातला कचरा इथे घेतला जातो. WASTE IS WEALTH हे इथल्या कार्यपद्धतीचं ब्रीदवाक्य आहे.

        ह्या गावात कचरा गोळा करण्याची पद्धत नेमून दिलेली आहे. सर्व नागरिक, व्यावसायिक ह्या सर्वांना नियम समान आहेत. कचरा जर दिलेल्या पद्धतीत वर्गीकरण करून ठेवला नसेल तर पहिल्यांदा समज दिली जाते, तरी पुन्हा काही आढळून आले तर साहेब थेट दंड करतात …मग समोर कुणीही असुदे.. !! ह्या गावात प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुद्धा कमी आहे.

        हे एवढं सगळं बघून खरच हे आपल्या देशात घडू शकतं ह्यावर विश्वास बसतच नव्हता. पण हे सगळं खरं आहे. प्रत्यक्षात घडलेलं आहे. हे एकाच दिवसात जादू होऊन घडलेलं नाही. ह्या साठी ह्यांचे साहेब म्हणजे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांची अथक मेहनत कारणीभूत आहे. हे साहेब २०१५ मध्ये बदली होऊन मुख्याधिकारी म्हणून वेंगुर्ला नगरपरिषदेत रुजू झाले. त्यानंतर ह्यांनी संपूर्ण गावाचा कायापालट केला आहे. ह्या सर्व कामात त्यांना त्यांचे सहकारी तसेच ग्रामस्थ, व्यावसायिक ह्या सर्वांची साथ मिळाली. सर्वसाधारणपणे सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांचा दिवस सकाळी ९.३० ला सुरु होतो. पण ह्या साहेबांचा मात्र दिवस सकाळी ६.०० वाजता सुरु होतो. रोज सकाळी प्रकल्पावर जाऊन सगळं काम नीट चालू आहे ना ह्याची पाहणी करणे, तसेच गावात घंटागाडीबरोबर फिरणे, लोकांच्या काही अडचणी असतील तर त्या सोडवणे, कचऱ्याच्या वर्गीकरणाबद्दल लोकांमध्ये जागरूकता व ते करणे का गरजेचे आहे ह्याची समज निर्माण करणे ही सर्व कामे ते सकाळी ९.३० पर्यंत करतात. नंतर १० ते ६ ते नगरपरिषदेच्या कार्यालयात त्यांच्या कामास हजर !! असे हे साहेब …गावात ह्या साहेबांबद्दल अतिशय आदर आहे तसेच भीती सुद्धा. हे साहेब ५ तारखेला मुंबई ला गेले होते कारण त्यांना त्यांच्या उल्लेखनीय कामाबद्दल राज्य शासनाकडून पुरस्कार प्राप्त झाला होता. आम्हाला हे साहेब भेटतील की नाही काही माहित नव्हतं. त्यांच्या कार्यालयातून आम्हाला थेट त्यांचा संपर्क क्रमांक देण्यात आला. साहेब रात्री उशिरा २ वाजता येणार होते पण सकाळी ७ वाजता त्यांचाच आम्हाला फोन आला !! आम्ही त्यांच्या निवासस्थानी गेलो. हे साहेब अतिशय साधे आहेत. कुठलाही सरकारी अधिकारी असल्याचा रुबाब, माज असल्याचा लवलेश देखील नाही. त्यांच्याबरोबर नाश्ता करताना त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टींचं मार्गदर्शन मिळाले. त्यांचा निरोप घेऊन आम्ही आमच्या प्रवासाच्या अखेरच्या टप्प्याकडे निघालो होतो. २ दिवस वेंगुर्ला ह्या गावात राहून आम्हाला खूप काही शिकायला मिळालं होतं. आमचा इतका प्रवास कुठेतरी सार्थकी लागल्यासारखा वाटला.

             ६ जून ला आम्ही कोकरे साहेबांना भेटून पणजी कडे निघालो, आता फार चढ उतार नव्हते. आता फक्त अंतर ६०-६५ किलोमीटर राहिले होते. महाराष्ट्राच्या सीमेवरचे शेवटचे गाव ‘तेरेखोल’ ओलांडून जसे आम्ही गोव्याच्या हद्दीत प्रवेश केला तशी सगळीकडे दारूची दुकाने आम्हाला दिसण्यास सुरुवात झाली. कोकणातली सगळी शांतता कुठच्या कुठे हरवली. गोव्यात पोचल्यावर तिथे कधीतरी पोर्तुगिजांची वसाहत होती हे समजत होतं. तिथली शहर रचना पाहून आपण खरंच भारतात आहोत का असा प्रश्न कोणालाही पडेल. असो अखेर आम्ही आमच्या मुक्कामास पोचलो…पणजी .. आत्तापर्यंत जवळपास ५५० किलोमीटर प्रवास झालेला होता. प्रवास पूर्ण झाल्याचं समाधान होतं. पणजी ला पोचल्यावर पुन्हा एकदा पावसाने आमचे स्वागत केले. आम्हीच उगाचंच ती निसर्गाने आम्हाला दिलेली शाबासकीची थाप समजलो ! ७ तारखेला वास्को-द-गामा रेल्वे स्थानकावर रेल्वे आमची वाट पाहत होती अन आम्हीसुद्धा तिची …!!!!!

भाग १ वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

Student of Law, Political Science & Environment.